प्रभातफेरी काढली, झेंडा फडकाविला म्हणून वर्षभराचा कारावास
By निशांत वानखेडे | Published: August 9, 2023 11:04 AM2023-08-09T11:04:36+5:302023-08-09T11:08:05+5:30
ऑगस्ट क्रांतिदिन विशेष : स्वातंत्र्याचे ते मंतरलेले दिवस : पुंडलिकराव गेडाम यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण
निशांत वानखेडे
नागपूर : ताे खराेखर मंतरलेला काळ हाेता. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने देशवासीयांच्या तनामनात स्वातंत्र्याची ज्वाला पेटली हाेती. या संग्रामात मीही उडी घेतली. भूमिगत नेत्यांच्या आदेशानुसार सीताबर्डी येथे प्रभातफेरी काढली व तिरंगा ध्वज फडकविला. इंग्रज पाेलिसांनी पकडले आणि वर्षभरासाठी कारागृहात डांबले. १८व्या वर्षी कालकाेठडी व कंबल परेड अनुभवलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक डाॅ. पुंडलिकराव गेडाम यांनी ‘भारत छाेडाे आंदाेलना’च्या आठवणींना उजाळा दिला.
१९२४ ला जन्मलेल्या डाॅ. गेडाम यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले, पण स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगताना त्यांचा उत्साह तरुणांसारखा वाटताे. १९४२च्या भारत छाेडाे आंदाेलनाच्या वेळी पुंडलिकराव पटवर्धन शाळेत शिकत हाेते व नवव्या वर्गात प्रवेश केला हाेता. नागपुरातही स्वातंत्र्याच्या प्रेरणेने वातावरण भारावले हाेते. त्यावेळी महात्मा गांधी यांच्या मुंबईत झालेल्या सभेत मी सहभागी झालाे हाेताे. महात्मा गांधी यांनी ‘अंग्रेजाे भारत छाेडाे’चा नारा दिला.
संपूर्ण देश इंग्रज राजवटीविरुद्ध पेटून उठला हाेता. आंदाेलन दडपण्यासाठी इंग्रजांनी माेठ्या नेत्यांना एका रात्रीतून अटक केली. त्यातून जयप्रकाश नारायण, अरुण आसफ अली हे सभेतील नेते भूमिगत झाले हाेते. या नेत्यांचा संदेश लाेकांपर्यंत पाेहोचविणे, भूमिगत लाेकांना खाण्यापिण्याच्या वस्तू पुरविणे, लाेकांमध्ये पत्रक वाटणे, पाेस्टर चिकटविणे, विद्यापीठाच्या परीक्षा उधळून लावणे, अशी कामे आमच्या तिसऱ्या फळीतील तरुणांकडे हाेती. यावेळी एकमेव सरकारी असलेल्या पटवर्धन शाळेच्या परीक्षा हाॅलमध्ये मिरचीची पावडर टाकून परीक्षा उधळल्याची आठवणही डाॅ. गेडाम यांनी सांगितली. डाॅ. गेडाम यांच्या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून सन्मानपत्र, ताम्रपत्र व २०१७ साली राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
नागड्या शरीरावर काठीचा मार : कंबल परेड
प्रभातफेरी काढताना इंग्रजांच्या हाती लागलाे आणि वर्षभर कारागृहात गेलो. नागड्या शरीरावर घाेंगडे पांघरून लाठीने बेदम मारण्याची कंबल परेड अनुभवली. कालकाेठडीतही २४ तास काढले. वर्षभरानंतर सुटका झाली, पुन्हा शाळेत गेलाे. त्यावेळी शिक्षकांनी आंदाेलनात सहभागी हाेणार नाही, असे लेखी आश्वासन देण्यास सांगितले. तसे करण्यास साफ नकार दिला, त्यामुळे शाळेत प्रवेशच मिळाला नाही. त्यामुळे बुटीवाडा येथे टिळक विद्यालयात प्रवेश घेतला.
पदवीच्या वर्षी गांधीजींचा खून
दहावी उत्तीर्ण केली व पुढे सातारा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला. हे साडेचार वर्षांचे पदवीचे शिक्षण घेत असताना महात्मा गांधीजींचा खून झाल्याची आठवण डाॅ. गेडाम यांनी सांगितली. १९५२ साली विदर्भात परतल्यानंतर आधी त्यांनी काटाेल व नरखेड येथे स्वत:चा दवाखाना टाकला. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी म्हणून नाेकरी मिळाली. १९८४ साली ते सेवानिवृत्त झाले.