लाथ लागली म्हणून धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकले; नागपूर-पुणे गरीबरथमध्ये थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 09:27 PM2022-08-25T21:27:12+5:302022-08-25T21:27:45+5:30
Nagpur News पुण्याहून नागपूरकडे येणाऱ्या गरीबरथ या रेल्वेगाडीत एका तरुणाची दुसऱ्याला लाथ लागली. त्यामुळे तरुणांच्या दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी एका तरुणाला धावत्या रेल्वे गाडीतून खाली फेकले.
नागपूर : पुण्याहून नागपूरकडे येणाऱ्या गरीबरथ या रेल्वेगाडीत एका तरुणाची दुसऱ्याला लाथ लागली. त्यामुळे तरुणांच्या दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी एका तरुणाला धावत्या रेल्वे गाडीतून खाली फेकले. त्यामुळे त्या तरुणाचा करुण अंत झाला. गुरुवारी सकाळी ८.२०च्या सुमारास बुटीबोरी ते गुमगाव रेल्वे ट्रॅकवर ही थरारक घटना घडली.
शेख अकबर (वय अंदाजे २५ वर्षे, रा. अकोला) असे मृत तरुणाचे नाव आहे. अकबर त्याच्या काही मित्रांसह बाबा ताजुद्दीन यांच्या नागपूर येथे सुरू असलेल्या ऊर्समध्ये सहभागी होण्यासाठी गुरुवारी सकाळी ५.३०च्या सुमारास गरीबरथ या ट्रेनमध्ये अकोला स्थानकावरून चढला. रेल्वेगाडीत मोठी गर्दी असल्याने अकबर त्याचे मित्र जनरल डब्यात दाराजवळ अन्य काही प्रवाशांसह दाटीवाटीने उभे होते. सकाळी ८ च्या सुमारास रेल्वेगाडी बुटीबोरीजवळ आली असताना शेख अकबर याचा पाय (लाथ) दुसऱ्या एका तरुणाला लागला. त्यावरून शेख अकबर आणि आरोपींमध्ये वाद सुरू झाला. हा वाद एवढा वाढला की आरोपी तरुणांनी शेख अकबरला धावत्या ट्रेनमधून खाली फेकले. अनेकांसमोर ही घटना घडली. मात्र, कुणीही कोणतीही मदत अकबरला केली नाही.
गाडी नागपूरच्या अजनी स्थानकावर आल्यानंतर अकबरच्या मित्रांनी रेल्वे पोलिसांना झालेल्या घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरिओम निरंजन, जीआरपीच्या पोलीस निरीक्षक मनीषा काशिद, एपीआय डोळे, एएसआय चहांदे, हवालदार पटले, शेळके, अली तसेच रेल्वे पोलिसांचा ताफा घटनास्थळाकडे रवाना झाला. बरीच शोधाशोध केल्यानंतर बुटीबोरी ते गुमगाव दरम्यान रेल्वेलाइनच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह आढळला. तो शेख अकबरच असल्याचे स्पष्ट झाले.
एकानेही चेन ओढली नाही
विशेष म्हणजे, अकबरसोबत चार ते पाच मित्र होते. तर, दुसरे काही तरुणही उर्स बघण्यासाठी अकोला स्थानकावरून रेल्वेत चढले होते. त्यांच्यासमोर अकबरला आरोपींनी धावत्या ट्रेनमधून खाली फेकले. मात्र अकबरच्या मित्रांनी अथवा गर्दीतील कुणीही चेन ओढून रेल्वेगाडी थांबविण्याचे किंवा १३९वर फोन करून मदत मागण्याचे प्रसंगावधान दाखवले नाही. परिणामी घटना घडल्यानंतर सुमारे दीड ते दोन तासपर्यंत अकबरला वैद्यकीय मदत मिळाली नाही. त्यामुळे त्याचा जीव गेला. जेव्हा रेल्वे पोलीस ट्रॅक चेक करत त्याच्याजवळ पोहोचले तोपर्यंत जखमी अकबरचा मृत्यू झाला होता.
संशयित आरोपी ताब्यात
अकबरच्या मित्रांनी दिलेल्या माहितीवरून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी शेख शरिक शेख अब्बास (वय २५, रा. अकोला) याला ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.
----