ठकबाज सोंटू जैनने फसविलेल्या तरुणाची गोंदियात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 10:26 AM2023-08-08T10:26:14+5:302023-08-08T10:34:51+5:30
लाखोंची फसवणूक झाल्याने ‘नवीन’ने उचलले टोकाचे पाऊल; सोंटूकडून मोबाइलमधील डेटाही नष्ट
नागपूर : ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून नागपुरातील व्यापाऱ्याची ५८ कोटींची फसवणूक करणाऱ्या अनंत ऊर्फ सोंटू जैन याच्यामुळे गोंदिया येथील नवीन नावाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. तरुणाच्या कुटुंबीयांना शांत करण्यासाठी सोंटूने एक कोटी रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांच्या तपासात ही बाब समोर आली आहे. याबाबत शहर पोलिसांनी गोंदिया पोलिसांना माहिती दिली आहे.
सोंटूविरोधात नागपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी धाड टाकण्याअगोदर सोंटू दुबईला फरार झाला होता. अटक टाळण्यासाठी त्याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. सोंटू आणि त्याच्या कुटुंबीयांकडून आतापर्यंत रोख रक्कम आणि सोने-चांदीसह ३१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्याच्या नागपुरातील लॉकर्समधूनदेखील घबाड सापडले होते. दरम्यान, गोंदियातील नवीन नावाच्या तरुणाला सोंटूच्या तावडीत अडकून आपला जीव गमवावा लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीनने अल्पावधीतच सोंटू्च्या जाळ्यात फसून मोठी रक्कम गमावली होती. त्याच्या या कृत्यामुळे घरातील लोकही रस्त्यावर आले. नंतर नवीनला सोंटूने फसवल्याचे समजले. त्याने सोंटूकडून पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न केला. सोंटूने त्याला धमकावले आणि ‘माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही’ असे म्हणत खडसावले. यानंतर नवीन तणावात गेला होता व त्याने आत्महत्या केली. नवीनने सुसाइड नोटही लिहून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. सोंटूच्या मोबाइलमध्ये फसवणूक झाल्याचे भक्कम पुरावे होते. हे प्रकरण गोंदिया पोलिसांपर्यंत पोहोचले.
गोंदिया पोलिसांमध्ये चांगलीच ओळख असल्यामुळे नवीनच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती सोंटूला मिळाली. नवीनच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन त्याने एक कोटी रुपये खर्च केले. त्याने नवीनचा मोबाइलही मिळवला व त्यातील सर्व डेटा उडवला. कुटुंबातील सदस्यांचे मौन आणि पुरावे नष्ट केल्यामुळे प्रकरण रखडले. नागपूर पोलिसांच्या तपासात हे सत्य समोर आले. सोंटूची नवी माहिती समोर आल्याने शहर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. पोलिस सोंटू आणि इतर बुकींचे सॉफ्टवेअर बनवणाऱ्यांचा शोध घेत आहेत.