मोहाच्या फुलाची दारू नव्हे आता घ्या कोल्ड्रिंक, नागपूरच्या युवकाने शोधून काढला फार्म्युला
By सुमेध वाघमार | Published: September 4, 2023 11:13 AM2023-09-04T11:13:41+5:302023-09-04T11:16:34+5:30
भारतात मोहफुलाचे जवळपास २२ लाख टन उत्पादन होते
सुमेध वाघमारे
नागपूर : मोहाची फुले, फळे, पाने, साल, लाकूड, मुळे, फांद्या या सर्वांचा उपयोग होत असल्याने हे झाड आदिवासींसाठी कल्पवृक्ष ठरले आहे. मोहफुलाची केवळ दारूच काढता येते अशातला भाग नाही, तर अल्कोहल काढण्यापासून ते औषधी, तेल, कपडे धुण्याचे साबण, मेणबत्ती, खत, रंग, धागा व पेपर बनिवण्यासाठी लागणारा लगदा, अलीकडे हेल्थ ड्रिंक तयार केले जात आहे. नागपूरच्या एका युवकाने याचा एक पाऊल पुढे टाकत मोहाच्या फुलापासून कोल्ड्रिंक तयार करण्याचा फार्म्युला शोधून काढला आहे.
भारतात मोहफुलाचे जवळपास २२ लाख टन उत्पादन होते. विदर्भात साधारण ५ ते ६ कोटी मोहाची झाडे आहेत. मोहफुलामध्ये अल्कोहोलचे प्रमाण ६७.९ टक्के असते. एक टन मोहफुलापासून सुमारे ३४० लिटर शुद्ध अल्कोहोल मिळते. मोहफुलामध्ये प्रोटीन १.४० टक्के, खनिज ७०, कार्बोहायड्रेड २२.७०, कॅलरीज १११, कॅल्शियम ४५, लोहतत्त्व २३, तर व्हिटॅमिन सी ४० टक्के असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
परिणामी औषधांपासून ते साबणापर्यंत अनेक उत्पादन बाजारात येत आहेत. लहानपणापासूनच मोहाच्या झाडाचे आकर्षण असलेल्या डॉ. अजय पिसे यांचे मागील काही वर्षांपासून मोहाचा फुला-फळांवर संशोधन सुरू आहे. यातूनच त्यांना हेल्थ ड्रिंक आणि आता ‘कोल्ड ड्रिंक’ तयार करण्याचा फार्म्युला मिळाला आहे. कोल्ड्रिंकची नुकतीच चाचणी घेतली असून पुढील महिन्यात ते बाजारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
- इतर कोल्ड्रिंकसारखीच चव
डॉ. पिसे म्हणाले, मोहाच्या फुलापासून तयार केलेली कोल्ड्रिंकची चव हे बाजारात उपलब्ध कोल्ड्रिंकसारखीच आहे. बाजारातील कोल्ड्रिंक पिल्यावर जी झिंग मिळते, चुरचुरीतपणा येतो ते यातही आहे. महत्त्वाचे म्हणजे यात हलका आंबटपणा आहे. यामुळे थोडी वेगळी चव मिळते.
-३० जणांवर चाचणी
बाजारात उपलब्ध असलेल्या दोन कंपन्यांच्या दोन कोल्ड्रिंक आणि मोहाच्या कोल्ड्रिंकची ३० जणांवर चाचणी घेतली. तीन ग्लासमध्ये या कोल्ड्रिंक ठेवून त्याची चव घेण्यास सांगितली तर यातील सर्वच जणांना मोहाची कोल्ड्रिंक आवडली. त्यांना ही मोहाची कोल्ड्रिंक असल्याचे सांगितल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
- कोल्ड्रिंकमध्ये कुठल्याही रसायनांचा वापर नाही
दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्राध्यापक असलेले डॉ. पिसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मोहाच्या फुलापासून तयार केलेले कोल्ड्रिंक पूर्णत: हर्बल आहे. यात कुठल्याही रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही.
बाजारात उपलब्ध असलेल्या कोल्ड्रिंकच्या तुलनेत यात जवळपास ३० टक्क्यांहून कमी एनर्जी तर २० टक्क्यांहून अधिक कार्बोहायड्रेट आहे. इतर कोल्ड्रिंकमध्ये जे नाही ते या कोल्ड्रिंकमध्ये प्रोटिन ४ एमजी, फॅट्स ६ एमजी व मायक्रोन्युट्रिएंट्स ६ एमजी आहे.