गर्लफ्रेंडला मॅसेज का केला? युवकाची धारदार शस्त्राने हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 10:39 AM2023-06-30T10:39:43+5:302023-06-30T10:41:22+5:30
जरीपटक्यात दिवसाढवळ्या थरार : सूत्रधारासह दोन विधिसंघर्षग्रस्तांचा समावेश
नागपूर : गर्लफ्रेंडला इन्स्टाग्रामवर मॅसेज केल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाचा दिवसाढवळ्या लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिपब्लिकननगरात घडली. पोलिसांनी या खुनाचा सूत्रधार अमित गणपत मेश्रामला अटक करून त्याच्यासोबत असलेल्या दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.
श्रेयांश पाटील (वय २१, रा. रिपब्लिकननगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी अमित कॅटरिंगचे काम करतो, तर मृत श्रेयांस कपड्याच्या दुकानात आणि कॅटरिंगचे काम करीत होता. श्रेयांसला दारू आणि गांजाचे व्यसन होते. त्याची एका युवतीसोबत मैत्री होती. घटनेचा सूत्रधार अमित मेश्रामने काही दिवसांपूर्वी श्रेयांसच्या गर्लफ्रेंडला इन्स्टाग्रामवर स्तुती करणारे मॅसेज पाठविले. गर्लफ्रेंडने ही स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली. ते पाहून श्रेयांस संतप्त झाला. त्याने अमितला इन्स्टाग्रामवर मॅसेज करून त्याच्या गर्लफ्रेंडला मॅसेज न करण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर वाद झाला. दोघांनीही एकमेकांना धमकी देऊन शिवीगाळ केली. दोघेही एकमेकांना पाहून घेण्याची भाषा वापरत होते.
गुरुवारी दुपारी १२ वाजता अमित आणि दोन विधिसंघर्षग्रस्त बालक श्रेयांसच्या घरी आले. त्यांनी श्रेयांसला चर्चा करण्यासाठी बौद्ध विहाराजवळ चलण्यास सांगितले. श्रेयांसनेही धोका ओळखून सोबत चाकू घेऊन गेला होता. बौद्ध विहाराजवळ श्रेयांसची आरोपींसोबत मारहाण झाली. आरोपींजवळ रॉड होते. त्यांनी रॉडने हल्ला केल्यानंतर श्रेयांसजवळील चाकू हिसकावून त्याच्यावर वार केला. त्याला गंभीर जखमी करून आरोपी फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी श्रेयांसला रुग्णालयात नेले; परंतु डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यातून त्यांना कोणताच सुगावा लागला नाही. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.