आ चल के तुझे मै लेके चलू, इक ऐसे गगन के तले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:25 AM2018-08-04T00:25:05+5:302018-08-04T00:29:06+5:30
कोणतेही गाणे अगदी गंभीर होऊन आणि दिलखुलासपणे गाणारे किशोर कुमार व्यवहारात खोडकर मात्र मनाने तेवढेच हळवे आणि भावनिक होते. नागपूरला राहणारी त्यांची पुतणी चंद्रा सान्याल यांनी किशोरदांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. काका चांगले गायक, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक असे सर्व काही होते, पण त्यापेक्षा माणूस म्हणून मला ते अधिक मोठे वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोणतेही गाणे अगदी गंभीर होऊन आणि दिलखुलासपणे गाणारे किशोर कुमार व्यवहारात खोडकर मात्र मनाने तेवढेच हळवे आणि भावनिक होते. नागपूरला राहणारी त्यांची पुतणी चंद्रा सान्याल यांनी किशोरदांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमासाठी आले की हॉटेल मध्ये कधी थांबत नसत. ‘मै तेरे घर मे रहुंगा, मुझे हॉटेल का खाना और वहां रहना अच्छा नही लगता’ असे सांगून जेवणाचा मेन्यू माझ्यापुढे ठेवायचे. सकाळी ब्रेकफास्टमध्ये बदकाच्या अंड्याचे आमलेट, पुरी-भाजी आणि प्राँझ मासे आणायला सांगायचे. माझा मुलगा पाळण्यात झुलत असला की, स्वत:च गाणे म्हणून त्याला झोका द्यायचे. इकडचे तिकडचे किस्से सांगायचे. माझ्या घरी ते कधी स्टार म्हणून वागलेच नाहीत. नेहमी हसत खेळत राहायचे. ते आले की संपूर्ण घर हास्याने भरून जायचे. काका चांगले गायक, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक असे सर्व काही होते, पण त्यापेक्षा माणूस म्हणून मला ते अधिक मोठे वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
किशोर कुमार ऊर्फ आभास कुमार गांगुली या महान गायकाला जाऊन आज अनेक वर्षे झालीत. मात्र हास्य, दु:ख, वेदना, विरह, बालपण अशा जीवनातील सर्व पैलूंना स्पर्श करणाऱ्या त्यांनी अगदी आत्मीयतेने गायलेल्या गीतांच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयामध्ये ते आजही जिवंत आहेत. ‘जिंदगी एक सफर है सुहाना...’ मधील त्यांची ‘याडलिंग’, ‘कमाता हु बहुत पर, कमाई डुब जाती है...’चा खोडकर अंदाज, ‘कोई हमदम ना रहा...’ मधली अतिशय दु:खी भावना त्यांनी उत्कटतेने व्यक्त केली. ‘खईके पान बनारसवाला...’ गाण्यासाठी शेकडो पान खाऊन अख्खी खोली त्यांनी रंगविल्याचे किस्सेही प्रसिद्ध आहेत. कुठलेही शिक्षण न घेता प्रत्येक अंदाजातील गाणे त्यांनी तन्मयतेने गायली आणि रसिकांनीही ती डोक्यावर घेतली. म्हणूनच रफी, मुकेश, मन्ना दा अशा महान गायकांच्या काळातही त्यांनी अढळ स्थान निर्माण केले. नागपूरकर रसिकांनीही त्यांचा हा दिलखुलास अंदाज अनेक कार्यक्रमांमधून अनुभवला. कस्तूरचंद पार्कवर झालेल्या कार्यक्रमात ते प्रेक्षकांमध्ये मिसळून गायले, टेबलाखाली लपून गाणे म्हटले, कोलांटउड्या मारल्या, स्टेजवर बेधुंद नाचले आणि तरुण-तरुणींच्या गालाला स्पर्श करून गायले. हे करताना त्यांचा आवाज कुठेही बेसूर झाला नाही. चिक्कार गर्दी असलेल्या हा कार्यक्रम प्रेक्षकांनी बेधुंद होऊन अनुभवला.
चंद्रा सान्याल यांनी सांगितले, ‘चलती का नाम गाडी’ चित्रपट पाहिल्यानंतर मला अनेकांनी ‘किशोर कुमार असेच होते का’ हा प्रश्न विचारला. मला वाटते काका खरोखर असेच होते. सामान्य माणसांसारखे. त्यांना वडिलांप्रमाणे मोठे बंधू दादा मुनी (अशोक कुमार) यांचाही आदर होता. त्यांच्यासमोर ते कधीही बोलत नसत. त्यांच्यापुढे येणाºया अडचणी दादा मुनींना सोडवायला सांगत. नागपूरला कार्यक्रमासाठी येणे झाले की माझ्या बाबांना (अनुप कुमार) सोबत आणत. ‘तेरे बेटी से मिलना है ना, तो चल मेरे साथ’ म्हणून बाबांना आवर्जून आणत. कार्यक्रम संपला की दुसºया दिवशी जाताना बाबांना ‘फिर कब आयेगा बेटी से मिलने’ म्हणून थांबायला सांगत. एकदा पत्नी लीना चंदावरकर, अमित व सुमित ही दोन्ही मुले व घरचा आवडता कुत्रा टॉमीला सोबत आणल्याची आठवण चंद्रा यांनी सांगितली. ते येणार असले की आम्ही आनंद भंडारमधून त्यांना आवडणारी संदेश (बंगाली मिठाई) मागवायचो. त्यांना नागपूरची संत्री आवडायची. ‘नागपूर के लोग और संत्रे का जवाब नही’ असे ते म्हणायचे. परतताना दरवेळी पेटी भरून संत्री सोबत घेऊन जायचे. १९८६ साली निधनाच्या एका वर्षापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमासाठी आले असताना खूप हळवे झाले होते. मला म्हणाले, ‘अमेरिका मे एक डॉक्टर दोस्त के पास गया था. उसने कहां, दादा आपके हार्ट के तीन कम्पार्टमेंट डाऊन है’ म्हणत भावनिक आठवण सान्याल यांनी सांगितली. त्यानंतर ते परत कधीच आले नाही, आली ती शेवटची वार्ता. ते भावनिक होते, लहानसहान गोष्टींनी रडायचे. ‘माझी कला प्रोफेशन नाही, माझ्या जीवनाची नाव आहे’, असे म्हणायचे. काकांना विसरणे खरच कठीण आहे, असे मनोगत सान्याल यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध गायक एम. ए. कादर यांनीही त्यांच्या किशोर कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला. १९६९ साली चिटणीस पार्कवर किशोर दांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यांच्या टीममधले अकार्डियन वाजविणारे कलावंत चरणजित मुंबईहून येऊ शकले नाही. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती व उशीर होत असल्याने प्रेक्षकांमध्ये असंतोष पसरला होता. त्या काळातील मुख्य वाद्य असल्याने किशोरदा अत्यंत निराश आणि अस्वस्थ झाले होते. त्यावेळी तीन वेळा आकार्डियन वाजविण्यासाठी माझ्या नावाची घोषणा झाली. मी घाबरलो होतो. आयोजकांनी प्रेक्षकांमधून मला खेचून नेले व त्यांच्यासमोर हजर केले. मी आकार्डियन वाजविणार हे कळल्यावर ते प्रचंड खूश झाले. त्याचवेळी नाना भुस्कुटे हे आकार्डियन वादकही तेथे पोहचले. किशोरदांनी स्टेजवर जाऊन प्रेक्षकांना ‘नागपूर के दो दो पहेलवान आये है, अब घबराओ मत’असे म्हणत कार्यक्रम सुरू केला. आम्ही दोघांनीही आळीपाळीने कार्यक्रमात आकार्डियन वाजविले. पुढे मुंबईला त्यांना भेटायला गेलो तेव्हा, ‘तुमने मेरे प्रोग्राम की इज्जत रखली यार’ म्हणत खूप आदरतिथ्य केल्याची आठवण कादर यांनी लोकमतशी बोलताना सांगितली.