५०० रुपयात आधार कार्ड
By admin | Published: November 15, 2014 02:49 AM2014-11-15T02:49:52+5:302014-11-15T02:49:52+5:30
केंद्र व राज्य सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला दस्तऐवज म्हणून युनिक आयडी नंबर (आधार कार्ड) नि:शुल्क उपलब्ध करून देण्याची योजना राबवीत आहे.
नागपूर : केंद्र व राज्य सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला दस्तऐवज म्हणून युनिक आयडी नंबर (आधार कार्ड) नि:शुल्क उपलब्ध करून देण्याची योजना राबवीत आहे. परंतु काही लोकांना याला पैसे कमावण्याचा धंदा बनविल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. शहरात अशी अनेक केंद्रे उघडली असून रांगेत न लागता ५०० रुपयात आधार कार्ड बनवून दिले जात आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित आधार केंद्राची सत्यता व कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी लोकमतची चमू संबंधित कार्यालयात पोहोचली. मनपा मुख्यालयापासून केवळ १ कि.मी. अंतरावर मोहननगर टेंट लाईन परिसरात हे आधार केंद्र उघडण्यात आले आहे. येथील काही जागरूक नागरिकानुसार मागील काही दिवसांपासून अनेक नागरिक दररोज मठाजवळील चौरसिया बिल्डिंगस्थित आधार केंद्राचा पत्ता विचारत येत आहेत. त्यामुळे लोकमतच्या चमूने सामान्य नागरिकांप्रमाणे आधार कार्ड बनविणाऱ्याला फोन करून कार्ड बनविण्याबाबत विचारणा केली. तेव्हा या कार्यालयातील चपराशी ग्राहकाला घ्यायला आला. त्याने कार्यालयात नेले. कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्याने आधार कार्डचे दर सांगितले.
पक्की पावतीसुद्धा!
निवास दस्तऐवज असेल तर प्रति व्यक्ती २०० ते ३०० रुपये, कुठलेही दस्तऐवज नसतील तर ५०० रुपयात आधार कार्ड बनवून देण्याचा दावासुद्धा त्याने केला. पैसे अधिक असल्याचे सांगितल्यावर मनपा कार्यालयात बरीच मोठी रांग असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर आधार कार्ड बनविण्यासाठी पक्की पावतीसुद्धा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्याने दिले. ती रसीद दाखविल्यावर मनपा कार्यालयातून आधार कार्ड मिळेल, असेही सांगण्यात आले.