५४४ महिलांना निराधार योजनेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:12 AM2021-08-18T04:12:27+5:302021-08-18T04:12:27+5:30
नागपूर : कोरोनामुळे पती गमाविलेल्या ५४४ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा आधार देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी ...
नागपूर : कोरोनामुळे पती गमाविलेल्या ५४४ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा आधार देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या उपस्थितीत जिल्हा कृती दलाची बैठक झाली. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्पणा कोल्हे यांनी ही माहिती दिली.
कोरोनामुळे एक पालक मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या १ हजार ३७० इतकी असून, त्यातील ३८१ बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल झाले आहेत. उर्वरित बालकांच्या घरी लवकरात लवकर जाऊन भेट देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. ज्या बालकांचे आई-वडील दोघेही कोरोनाने मृत्यू पावले आहेत, त्यांच्या मालमत्तेची नातेवाईक किंवा अन्य कुणी विक्री करू नये म्हणून सहनिबंधक कार्यालयांना पत्र देण्यात यावे. तसेच या बालकांच्या शाळेच्या फीबाबत शिक्षण विभागालाही पत्र देण्यात यावे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना लाभ देण्यात येणाऱ्या सर्व कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाने जलदगतीने कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष राजू थोरात, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकारी प्रतिभा फाटे उपस्थित होते.