डाक विभागाचा अनाथ बालकांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 08:51 PM2020-02-04T20:51:22+5:302020-02-04T20:52:59+5:30
अनाथाश्रमातील मुलांना आधारशी जोडता यावे म्हणून एक अभियान डाक विभागाने राबविले आहे. याअंतर्गत पहिला कॅम्प श्रद्धानंद पेठ येथील अनाथाश्रमात राबविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाची स्वतंत्र एक ओळख असायला हवी, याकरिता प्रत्येक बालकाला आधारशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अनाथाश्रमातील मुलांना आधारशी जोडण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. विशेषत: त्यांची जन्मनोंद आणि पालकांबाबत अनेक समस्या येतात. हे अडथळे दूर करून त्यांनाही आधार लिंक करण्यासाठी डाक विभागाने पुढाकार घेतला आहे. या मुलांना सहज आधारशी जोडता यावे म्हणून एक अभियान डाक विभागाने राबविले आहे. याअंतर्गत पहिला कॅम्प श्रद्धानंद पेठ येथील अनाथाश्रमात राबविण्यात आला.
आधार कार्ड ही आज प्रत्येक नागरिकाची गरज झाली आहे. शासनाच्या कोणत्याही योजना, बँकेचे व्यवहार असो किंवा मोबाईलचे सीमकार्ड घेण्याचा प्रकार, प्रत्येक गोष्ट आधार लिंकशिवाय अपूर्ण आहे. अनाथाश्रमातील मुलांसमोर मात्र आधार लिंकच्या अनेक अडचणी आहेत. एकतर त्यांच्या जन्माच्या नोंदणीची अडचण आहे आणि दुसरीकडे पालक म्हणून कुणाचे नाव नोंदवायचे हाही मोठा प्रश्न आहे. ही अडचण दूर करण्यासाठी डाक विभागाने अनाथाश्रमात आधार नोंदणीचे अभियान राबविले आहे. प्रत्येक बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा अधिकार असून, बालकांना त्यांची विशिष्ट ओळख असल्यास रस्त्यावर आढळून येणाऱ्या बालकांसोबतच विविध बालगृहांमधील बालकांचे संगोपन, निरीक्षण, नियंत्रण सोयीस्कर होण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे राज्यभरातील अनाथ बालकांसह विविध कारणांनी बालगृहात दाखल झालेल्या मुलांचे आधार तयार करून त्यांना रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे (यूआयडीएआय) आयोगाने प्रस्ताव सादर केल्यानंतर डाक विभागाने अनाथाश्रमातच आधार नोंदणी माहिती चालविली आहे. जन्मतारखेची अडचण सोडविण्यासाठी अनाथाश्रमातील पोलीस रेकार्डनुसार असलेली जन्मतारखेची नोंद ग्राह्य धरत संबंधित अनाथालयाचा पत्ता बालकांच्या आधार कार्डवर टाकला जात आहे. अनाथाश्रमाचे संचालक आणि नियमित कर्मचाऱ्यांना या बालकांचे पालक म्हणून ग्राह्य धरले जात आहे. त्यानुसार राबविलेल्या शिबिरात अनाथाश्रमाच्या ११० मुलांचे नवीन आधार कार्ड काढण्यात आले. श्रद्धानंद अनाथालयाच्या संचालिका डॉ. निशा बुटी, ललिता गावंडे, उज्ज्वला बांगर, प्रतिमा दिवाणजी, रेखा वाघमारे आदींचे पालक म्हणून नाव नोंदविण्यात आले. मुलांचे भारतीय डाक विभागाच्या आयपीपीबीबीचे नवीन अकाऊंट काढण्याचे काम करण्यात आले.
यावेळी सिनिअर पोस्टमास्टर जयेश जोशी व मार्केटिंग ऑफिसर धनंजय राऊत, निनीश कुमार, संजीव कुमार, निवृत्ती केंद्रे, संजय साठे, अजय शेंडे, सांची रामटेके आदींचा सहभाग होता. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध कायदे अस्तित्वात असले, तरी विविध कायद्यांमुळेही या प्रक्रियेत अडचणी येतात. त्यासोबतच मतिमंद मुले, अनाथ मुले, बालकामगार यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. कागदपत्रांअभावी अनेक योजनांपासून निराधार बालके वंचित राहतात. अनाथालयातील बालकांबरोबरच रस्त्यावरील भिक मागणाऱ्या बालकांचीही आधार नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज आहे. अशा संस्थांनी सामाजिक भावनेतून बालहक्क जोपासण्यासाठी काम करण्याचे आवाहन धनंजय राऊत यांनी केले.