आधार अपडेट दोन महिन्यापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 09:17 AM2020-05-22T09:17:57+5:302020-05-22T09:19:25+5:30
कोरोना संक्रमणामुळे आधार अपडेट गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.
सैयद मोबीन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे आधार अपडेट गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. कोणत्याही सरकारी योजनेकरिता आधार कार्ड आवश्यक आहे. परंतु, त्यात मोबाईल क्रमांकाची नोंद नसल्यामुळे ऑनलाईन दुरुस्ती करणे अशक्य होत आहे.
कोरोना संक्रमण लक्षात घेता भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सदस्यांना त्यांच्या खात्यातील ७५ टक्के किंवा तीन महिन्याच्या मूळ वेतनाएवढी रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. परंतु, अनेक सदस्यांना केवायसी अपडेट नसल्याने किंवा आधार व ईपीएफओमधील नाव जुळत नसल्याने या सुविधेचा लाभ घेणे अशक्य होत आहे. तसेच, सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय ईपीएफओने ई-नॉमिनेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यातही विविध समस्या येत आहेत. सर्व कागदपत्रांमध्ये नाव व जन्मतारीख समान असलेल्या सदस्यांचे काम सुरळीत होत आहे. इतरांना मात्र बराच त्रास सहन करावा लागत आहे.
रेशन दुकानांप्रमाणे सुविधा का नाही?
कोरोना संक्रमणामुळे रेशन दुकानांमध्ये ग्राहकांचे बायोमेट्रिक मशीनवर पंचिंग करणे बंद करण्यात आले आहे. सध्या केवळ रेशन दुकानदाराला पंचिंग करावे लागते. अशीच व्यवस्था आधार केंद्रांवर का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आधार केंद्रे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, यासंदर्भात स्थानिकस्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घ्यायचा आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी यावर विचार करण्यात येईल असे सांगितले.