आधार क्रमांक ‘लिंकिंग’चा गोरखधंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 01:23 AM2017-09-17T01:23:02+5:302017-09-17T01:23:16+5:30
शासनाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना राष्टÑीयीकृत बँकांमध्ये बचत खाते उघडायला लावले.
राम वघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांद : शासनाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना राष्टÑीयीकृत बँकांमध्ये बचत खाते उघडायला लावले. नियमानुसार विद्यार्थ्यांच्या बँक खाते क्रमांकाला त्यांचा आधार क्रमांक ‘लिंक’ करावयाचा होता. त्यासाठी नांद (ता. भिवापूर) येथील जिल्हा परिषद विद्यालयात एका खासगी संस्थेला पाचारण करण्यात आले होते. या संस्थेच्या सदस्यांनी आधार क्रमांक ‘लिंंक’ करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून २०० रुपये वसूल केले.
शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असून, त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. यार्पकी एका योजनेंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती बँक खात्यात जमा केली जात असल्याने विद्यार्थ्यांनी पदरमोड करून राष्टÑीयीकृत बँकेत आपापली बचत खाती उघडून खाती क्रमांक शाळेत सादर केली.
नांद येथील जिल्हा परिषद विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाºया एकूण ५१३ विद्यार्थ्यांपैकी २०५ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्या विद्यार्थ्यांच्या बँक खाते क्रमांकांना ‘लिंक’ करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाच्यावतीने या शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने एका खासगी संस्थेला शाळेतच पाचारण करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना पैसे द्यावे लागतील की नाही, द्यायचे झाल्यास किती रुपये द्यावे लागतील, याबाबत कुणीही कुणालाच कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या.
दुसरीकडे आधार क्रमांक ‘लिंक’ करण्यासाठी प्रत्येकी २०० रुपयांची मागणी केली जात असल्याने पालकांमध्ये चर्चेचा विषय बनला. या संदर्भात मुख्याध्यापक प्रकाश धोटे यांना विचारणा केली असता, पैसे देण्याबाबत आपण कुणालाही सूचना केली नसल्याचे त्यांनी सांगितले. आधार क्रमारंक ‘लिंक’ करण्यासाठी उमरेडहून आॅपरेटर बोलावण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २०० रुपयांची मागणी करून सदर काम सुरू केले, अशी माहिती आपल्याला मिळाली, असेही प्रकाश धोटे यांनी स्पष्ट केले.
५५ विद्यार्थ्यांनी दिले पैसे
नांद येथील जिल्हा परिषद विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत यावर्षी एकूण ५१३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या एकूण १५० आणि इयत्ता अकरावी व बारावीच्या एकूण ५५ विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यांना त्यांचे आधार क्रमांक ‘लिंक’ करावयाचे होते. तशा सूचना समाजकल्याण विभागातर्फे मुख्याध्यापकांना ‘व्हॉटसअॅप’वर देण्यात आल्या होत्या. आधार क्रमांक ‘लिंक’ करण्यासाठी संबंधित संस्थेच्या कर्मचाºयांनी यातील ५५ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २०० रुपये वसूल केले.
महा-ई केंद्राचा उपयोग काय?
नांद हे परिसरातील मोठे गाव असून, येथे शासनाचे महा-ई केंद्र देखील आहे. या केंद्रात नागरिकांना त्यांचे आधार क्रमांक ‘लिंक’ करण्याची कामे केली जातात. त्यासठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ३० रुपये घेतले जात असून, पैसे मिळाल्याची पावतीही संबंधिताला दिली जाते. या केंद्राबाबत सर्वांनाच माहिती आहे. मग, विद्यार्थ्यांना आधार क्रमांक ‘लिंक’ करण्यासाठी या केंद्रात पाठविण्याऐवजी खासगी संस्थेला शाळेत का पाचारण करण्यात आले, ते कुणाच्या आदेशान्वये करण्यात आले, या संपूर्ण प्रकाराची निरपेक्ष चौकशी करणे, दोषींवर कारवाई करणे तसेच विद्यार्थ्यांचे प्रत्येकी २०० रुपये त्यांना परत करणे गरजेचे आहे.
आॅपरेटरने काढला पळ
या संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती व सदर प्रतिनिधीने विचारणा केल्यानंतर मुख्याध्यापक प्रकाश धोटे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे, आॅपरेटरने त्यांच्या साहित्याची आवराआवर करून शाळेतून काढता पाय घेतला. त्यामुळे या शाळेतील ५५ विद्यार्थ्यांनी आॅपरेटरला दिलेल्या प्रत्येकी २०० रुपयांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यातच या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणार असल्याची माहिती बीडीओ भुजंग गजभिये यांनी फोनवर दिली. आपण कुणालाही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्यांना ‘लिंक’ करण्याचे आदेश दिले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.