आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 07:15 IST2024-12-21T07:14:10+5:302024-12-21T07:15:15+5:30
मागचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवरील होते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केली. त्या दोघांनाही लवकरात लवकर अटक करण्यात यावी, तसेच संजय राऊत यांच्या सुरक्षेत आणि घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली.
आपण दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांना भेटलात याचे कारण काय, असे विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्याकरिता दोन युवक मोटारसायकलने आले होते. ते कशासाठी आले होते, त्यांचा उद्देश काय होता, याचा पोलिसांनी त्वरित तपास करून त्यांना अटक करावी.
मागील काही दिवसांत कायदा- सुव्यवस्था बिघडली आहे. विविध घटना घडताहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने पुढील पाच वर्षांत अनेक भेटी होतील, ही अपेक्षा आहे. सत्ताधारी आणि विरोधी एकत्र येऊन ज्या घटना घडत आहे त्यांवर उपाययोजना व्हायला हव्यात. दोन्ही बाजू मिळून कार्य करतील तर सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण होईल, अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली.
मागचे मुख्यमंत्री कॉन्ट्रॅक्ट बेसवरील
मागचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवरील होते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.