चिमुकल्या आर्यनला पाळण्याचा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2016 02:45 AM2016-03-06T02:45:22+5:302016-03-06T02:45:22+5:30

आर्यन आता एक वर्षाचा झाला होता. नुकताच ९ फेब्रुवारीला त्याचा वाढदिवसही झाला. बोबडे शब्द बोलत घरात खेळणारा, बागळणारा तान्हा आर्यन सर्वांना हवाहवासा झाला होता.

Aam Aadmi Party Aam Aadmi Party | चिमुकल्या आर्यनला पाळण्याचा फास

चिमुकल्या आर्यनला पाळण्याचा फास

Next

मंगर कुटुंबीयांवर शोककळा : सोमलवाडा परिसरात घडली घटना
निशांत वानखेडे  नागपूर
आर्यन आता एक वर्षाचा झाला होता. नुकताच ९ फेब्रुवारीला त्याचा वाढदिवसही झाला. बोबडे शब्द बोलत घरात खेळणारा, बागळणारा तान्हा आर्यन सर्वांना हवाहवासा झाला होता. वडील त्याच्या भविष्यासाठी मेहनत घेत होते. पतीसोबत घराला आर्थिक आधार मिळावा म्हणून आर्यनची आईही घरकाम करायला जात होती. त्याही दिवशी ती नेहमीप्रमाणे अंगाईगीत गाऊन आर्यनला पाळण्यात झोपवून कामाला गेली, मात्र ज्या पाळण्यात टाकताच रडणारे बाळ शांत होते तोच पाळणा आपल्या बाळाला कायमचा शांत करेल हे त्या माऊलीला कुठे माहीत होते. परतली तेव्हा तिचे काळीजच फाटले होते. नियतीने याच पाळण्याला बांधलेला दुपट्टा फास बनवून चिमुकल्या आर्यनचे प्राण हरले.

हृदयाला चटका लावणारी ही घटना सोमलवाड्याच्या राहुलनगर परिसरात घडली. आर्यन गोपाल मंगर असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव. काळाने येथील मंगर कुटुंबीयावर मोठा घाव घातला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्यनचे वडील गोपाल विठ्ठल मंगर एका कंपनीत मार्केटिंगच्या कामाला आहेत. लग्नाला सहा वर्षे झाली व संसाराला दोन फुलेही आली. मोठा अनिकेत व लहान आर्यन. त्यांच्या घरीच गोपालची बहीण आणि जिजा सोबत राहतात. तेही दररोज कामाला जातात. गोपालच्या कमाईसह मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक आधार मिळावा म्हणून गोपालची पत्नी सीमा आसपासच्या परिसरात घरकाम करायला जाते. बाळाला पाळण्यात झोपवायचे आणि कामाला जायचे, असा तिचा नित्यक्रम. शुक्रवारीही रोजच्या प्रमाणे सर्व कामावर निघून गेले होते. सीमानेही आर्यनला पाळण्यात झोपविले. सवयीप्रमाणे बाळ पाळण्यातून पडू नये म्हणून कमरेजवळ तिने दुपट्टा बांधला. मात्र हाच दुपट्टा आर्यनसाठी काळ ठरला. अचानक आर्यनला जाग आली आणि तो पाळण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागला.

निष्काळजीपणा की कुटुंबाची गरज?
नागपूर : मात्र आर्यनचा हंबरडा ऐकायला तिथे कुणीही नव्हते. या प्रयत्नात पाळणा उलटा झाला आणि कमरेभोवतीचा सैल झालेला दुपट्टा गळ्यापर्यंत सरकला आणि त्यानेच फास लागला. घटना दुपारी १२ ते १२.३० वाजता घडल्याचे गोपाल यांनी सांगितले. १ वाजताच्या दरम्यान आर्यनची आत्या कामे आटोपून घरी पोहचली तेव्हा तिनेही हंबरडा फोडला. मात्र स्वत:ला सावरत तिने भाऊ गोपालला फोन केला आणि तातडीने आर्यनला जवळच्या रुग्णालयातही नेले. मात्र आर्यन कायमचा हरवला होता.
आर्यन आता सोडून गेला. मात्र यात चूक कुणाची हा प्रश्न निर्माण होतो. पाळण्याला दुपट्टा बांधून आणि त्याहीपेक्षा बाळाला एकटे सोडून जायला नको होते. या निष्काळजीपणातूनच आर्यनचा मृत्यू झाला, असे चर्चिले जात आहे. मात्र हा त्या माऊलीचा निष्काळजीपणा की, कुटुंबाची गरज भागविण्याची धडपड हा प्रश्न आहे. कारण सायंकाळच्या भाकरीची व्यवस्था करण्यासाठी ती कामावर निघून गेली. घरी गेल्यावर तान्हुल्या आर्यनला चिऊचा घास देऊ, असे तिचे स्वप्नरंजन होते. मात्र नियतीला वेगळेच मंजूर होते.-आर्यनची आई सीमा निपचित पडली होती. बोलायची इच्छा नसतानाही वडील गोपाल यांनी घडलेली हकीकत सांगितली. मात्र हे सांगताना बापाच्या डोळ्यांच्या कडांचा ओलावा थांबत नव्हता. (प्रतिनिधी)

Web Title: Aam Aadmi Party Aam Aadmi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.