‘आप’ सोडविते प्रशासकीय ताप

By admin | Published: October 2, 2016 02:47 AM2016-10-02T02:47:09+5:302016-10-02T02:47:09+5:30

आकाशवाणी चौक ते महाराजबाग चौकादरम्यान ८ चिनार, ग्रीन पार्क कॉलनी येथे आम आदमी पक्षाचे कार्यालय आहे.

'AAP' solves administrative fever | ‘आप’ सोडविते प्रशासकीय ताप

‘आप’ सोडविते प्रशासकीय ताप

Next

कार्यालयासाठी पदाधिकाऱ्याने दिले घर : साप्ताहिक बैठकीत लढ्याचे नियोजन
नागपूर : आकाशवाणी चौक ते महाराजबाग चौकादरम्यान ८ चिनार, ग्रीन पार्क कॉलनी येथे आम आदमी पक्षाचे कार्यालय आहे. पक्षाचे हे कार्यालय सामान्य नागरिकांसाठी एकप्रकारने मदत कक्षच आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून सामान्य नागरिकाला दिला जाणारा ताप दूर करण्याचे मुख्य काम ‘आप’च्या कार्यालयातून केले जाते. येथे दररोज दुपारनंतर पदाधिकारी जमतात. नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करतात. साप्ताहिक बैठकीत आंदोलनांचे नियोजन करतात.

‘आप’चे कार्यालय हे पक्षाचे विदर्भ सचिव जगजित सिंग यांचे घर आहे. सिंग यांनी कुठलेही भाडे न स्वीकारता पक्ष कार्यालयासाठी आपले घर दिले आहे. ‘आप’चे हे चौथे कार्यालय आहे. यापूर्वी गणेशपेठ, वर्धमाननगर, धंतोली येथे कार्यालय होते.
विधानसभा निवडणुकीनंतर धंतोली येथून ग्राीन पार्क कॉलनी येथे कार्यालय स्थानांतरित करण्यात आले. ‘आप’च्या या कार्यालयातून नागपूरसह विदर्भाचेही कामकाज चालते. विदर्भातील पदाधिकाऱ्यांची दर तीन महिन्यातून एकदा बैठक होते. पक्षाची विधानसभानिहाय कार्यालयेही आहेत. या कार्यालयातून पश्चिम नागपूर विधानसभेचाही कारभार चालविला जातो. पक्षाचे प्रचार साहित्य, जनजागृतीसाठी वापरले जाणारे फलक, आंदोलनांमध्ये वापरले जाणारे बॅनर आदी सर्व साहित्य येथे साठवून ठेवले आहे.
संगणक, इंटरनेट आदी सोई येथे उपलब्ध आहेत. पक्ष कार्यालयाच्या समोरील अंगणात सुमारे २०० कार्यकर्त्यांची बैठक घेता येईल एवढी जागा उपलब्ध आहे.

असे चालते कामकाज
पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे राजकीय पार्श्वभूमी असलेले नाहीत. बहुतांश पदाधिकारी नोकरी, व्यवसाय करणारे, शिक्षण घेणार आहेत. त्यामुळे दुपारी २ वाजता कार्यालय उघडते व रात्री १० पर्यंत सुरू असते. दुपारी ४ वाजता जिल्हा पदाधिकारी व विधानसभा पदाधिकारी कार्यालयात येतात. वर्षभरापूर्वी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. मात्र, असे असले तरी सर्वजण त्यावेळच्या जबाबदारीनुसार काम करीत आहेत. दर आठवड्याला विदर्भ समन्वयक देवेंद्र वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक होते. या बैठकीत साप्ताहित नियोजन आखले जाते. तर दर १५ दिवसात एकदा शहर, विधानसभा यासह सर्व आघाड्या व सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होते. या बैठकीत आंदोलनांची रूपरेषा आखली जाते. पक्षाने इव्हेंट टीम, मीडिया टीम, परमिशन टीम यांच्यावर जबाबदारी सोपविली जाते. विधानसभा स्तरावर असलेली कार्यालयेही दुपारी २ वाजता उघडतात व तेथेही याच धर्तीवर कामकाज चालते. कार्यालयात ३० हजार नागरिकांची नावे व मोबाईल क्रमांकाचा डाटा संगणकीकृत करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाला एखादे मोठे संमेलन घ्यायचे असेल तर या सर्व नागरिकांना एकाचवेळी संदेश पाठविणे सोपे जाते. यासोबतच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे १२०० लोकांचे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यांच्या माध्यमातून वॉर्ड स्तरावरील पक्षाच्या कार्यकर्त्यापर्यंत संदेश पोहचविला जातो.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक
शहर जिल्हा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दररोज कार्यालयात येणे बंधनकारक आहे. विधानसभा पदाधिकाऱ्यांवरही उपस्थितीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा समन्वयक अशोक मिश्रा व समन्वयक कविता सिंगल यांच्याकडे कार्यालयीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शालिनी अरोरा या महिला सेलच्या प्रमुख असून महिलांचे संघटन बांधणीचे काम त्या करीत आहेत. ब्लॉक स्तरावरील कार्यकारिणीमध्ये महिलांचा सहभाग असणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थी आघाडीची जबाबदारी कृतल वेळेकर व श्रीधर आगासे हे पाडत आहेत.

मदतीसाठी हेल्पलाईन नंबर
नागरिकांना आपला प्रश्न, समस्या, अडचण मांडण्यासाठी ‘आप’च्या पदाधिकाऱ्याला शोधत बसावे लागू नये, त्याला तत्काळ आपली अडचण सांगता यावी यासाठी ‘आप’तर्फे ९५४५०७७२२२ हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. या हेल्पलाईन नंबरचे स्टीकर तयार करून बस, आॅटो, सार्वजनिक स्थळी चिपकविण्यात आले आहेत. या क्रमांकावर येणारे फोन आळीपाळीने चार पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर डायव्हर्ट होतात. संबंधित पदाधिकारी फोन करणाऱ्याचे नाव, पत्ता व प्रश्न लिहून घेतात. प्रश्न सहज सुटणारा असेल तर त्याला तसे मार्गदर्शन करतात, नाहीतर त्याला पक्षाच्या कार्यालयात भेटीसाठी बोलावतात. त्यानंतर संबंधिताचा प्रश्न ऐकून घेत तो कोणत्या विभागाशी संबंधित आहे याचे वर्गीकरण करून पदाधिकाऱ्यांकडे सोपवितात. कुणाच्या व्यक्तिगत व कौटुंबिक वादात पक्षातर्फे हस्तक्षेप केला जात नाही.
- कमलेश वानखेडे

Web Title: 'AAP' solves administrative fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.