‘आप’ राज्यातील सर्व जागा लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 01:00 AM2018-11-04T01:00:48+5:302018-11-04T01:01:33+5:30
गेल्या काही काळापासून संघटन मजबुतीसाठी धडपडणाऱ्या आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात नागपुरात महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली व राज्यातील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. सातत्याने प्रयत्न करूनदेखील ‘आप’ला राज्यात आपले हवे तसे अस्तित्व निर्माण करता आलेले नाही. अशा स्थितीत ग्रामीण पातळीवर संघटन मजबुतीवर ‘आप’तर्फे भर देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही काळापासून संघटन मजबुतीसाठी धडपडणाऱ्या आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात नागपुरात महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली व राज्यातील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. सातत्याने प्रयत्न करूनदेखील ‘आप’ला राज्यात आपले हवे तसे अस्तित्व निर्माण करता आलेले नाही. अशा स्थितीत ग्रामीण पातळीवर संघटन मजबुतीवर ‘आप’तर्फे भर देण्यात येणार आहे.
२ व ३ नोव्हेंबर ला ‘आप’चे महाराष्ट्र राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या नियोजनावर सखोल मंथन करण्यात आले. नेमक्या कुठल्या मतदारसंघात ‘आप’चे प्राबल्य आहे, तसेच मतांच्या गणितात ‘आप’ कसा बदल घडवून आणू शकेल यावर चर्चा झाली. राज्यातील सर्व लोकसभा क्षेत्रांसाठी संघटन प्रमुख नियुक्त करण्यात आले. तसेच पुढील दोन महिन्यात गाव व वॉर्ड स्तराची जबाबदारी निश्चित करण्याचादेखील निर्णय यावेळी झाला.
बैठकीला ‘आप’चे राज्य संयोजक सुधीर सावंत, सहसंयोजक रंगा राचुरे, सचिव सुभाष तंवर, कोषाध्यक्ष जगजितसिंग, अजिंक्य शिंदे, उन्मेष बागवे, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.गावित, अलीम पटेल, धनंजय शिंदे, किशोर मानध्यान, डॉ.देवेंद्र वानखडे, कविता सिंघल प्रामुख्याने उपस्थित होते.
संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावा
या बैठकीत शेतकरी समस्या व दुष्काळग्रस्त परिस्थितीवरदेखील चर्चा झाली. राज्य शासनाने सर्व राज्यात दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पक्षातर्फे व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली.