'आप'ची 'मोदी हटाओ, देश बचाओ'ची हाक, देशभर पोस्टरबाजी
By नरेश डोंगरे | Published: March 30, 2023 06:04 PM2023-03-30T18:04:01+5:302023-03-30T18:11:45+5:30
आंदोलनातून जनजागरण
नागपूर : तोंड उघडायचे असेल तर फक्त माफी मागण्यासाठी उघडा. विरोधात बोलण्यासाठी तोंड उघडले तर कारवाई करून, कारागृहात टाकून गप्प केले जाईल, अशी खतरनाक भूमीका केंद्रातील मोदी सरकारने घेतली आहे. त्याविरोधात आम आदमी पार्टीने 'मोदी हटाओ, देश बचाओ'ची हाक दिली असून, जनजागरण करण्यासाठी देशभर पोस्टरबाजीच्या माध्यमातून आंदोलन करण्याची भूमीका घेतली आहे. आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सीबीआय, ईडी, निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांना हाताशी धरून मोदी सरकार विरोधी पक्षाचा आवाज दाबत आहे. चांगले काम करणाऱ्या आप सरकारमधील मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन सारख्या मंत्र्यांना कारागृहात डांबण्यात आले. अदानीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज बुलंद करणाऱ्या राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर अपिलात जाण्याची मुदत असताना देखिल तडकाफडकी त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व निलंबीत करण्यात आले. शेतकरी, कामगाराचे हित मारले जात आहे आणि कुणी विरोधात तोंड उघडले तर ते अशा पद्धतीने बंद केले जाते. दिल्लीत 'मोदी हटाओ, देश बचाओ'चे पोस्टर लावले म्हणून आपच्या १११ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे मोदी सरकारविरुद्ध पोस्टरबाजी करून आप तर्फे जनजागरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार, आज ३० मार्चपासून देशभर पोस्टर लावले जाणार आहे. मोदी सरकारने या संबंधाने किती जणांवर गुन्हे दाखल करायचे आहे आणि किती जणांना कारागृहात टाकायचे आहे, ते टाकावे, असे पार्टीचे पदाधिकारी जगजित सिंग म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हा संयोजक कविता सिंगल तसेच अन्य पदाधिकारी अंबरिश सावरकर, डॉ. शहिल अली जाफरी, अशोक मिश्रा, शंकर इंगोले, महाजन, शाम बोकडे, विशाल वैद्य, पंकज मेश्राम आदी उपस्थित होते.