७ कोटींची वसुली अन् उद्धव ठाकरे कनेक्शन; आ. राणांचे अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2022 16:48 IST2022-09-13T16:36:06+5:302022-09-13T16:48:14+5:30
आरती सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.

७ कोटींची वसुली अन् उद्धव ठाकरे कनेक्शन; आ. राणांचे अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप
नागपूर : हनुमान चालीसा, महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण ते आता कथित लव्ह जिहाद प्रकरणातून सातत्याने राणा दाम्पत्य सातत्याने चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. आमदार रवी राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरती सिंग यांनी अडीच वर्षात महिन्याला ७ कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोहचवले, असा गंभीर आरोप रवी राणांनी केला. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना एकसूत्री कार्यक्रम दिला होता. खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्यावर जितके गुन्हे दाखल करता येईल, तेवढे खोटे गुन्हे दाखल करा असे निर्देश दिले होते, असे रवी राणा म्हणाले.
महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणांविरोधातील गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग
आरती सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मनपा आयुक्तांवर शाईफेक झाली त्यावेळी मी अमरवातीत नसतानाही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला तेव्हा मोठ्या प्रमाणात पोलीस पाठवून आम्हाला दोन दिवस नजरकैद केलं होतं. शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तेव्हा माझ्या सोबत अनेक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकलं, नवनीत राणांना नजरकैदेत ठेवलं. तसेच, अनेक कार्यकर्त्यांवर तडीपारी लावली. कोल्हे हत्या प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केल्याचा आरोपही राणा यांनी केला.
आरती सिंग यांनी अमरावतीमध्ये एकसुत्री वसुली पथक नेमलं होतं. वसुली पथकाच्या माध्यमातून अमरावतीत मोठ्या प्रमाणात गुन्हे घडले, दंगे झाले. कोल्हे यांची हत्या झाली. आज अमरावतीत रोज गुन्हे होतात, अवैधंदे चालतात, हत्या होत आहेत. आरती सिंग यांनी दर महिन्याला अमरावतीमधून सात कोटी रुपयांची वसुली केली असून त्याच्यातून उद्धव ठाकरे यांना पैसा पोहोचवल्याचा दावा राणा यांनी केला आहे. याप्रकरणातील तपास सीआयडीकडे देण्यात आलेला आहे. आमच्याकडे त्या संदर्भात पुरावे आहेत ते आम्ही योग्यवेळी सीआयडीकडे देऊ असंही रवी राणा यांनी सांगितलं.