आषाढी एकादशी; विदर्भाच्या पंढरपुरात भक्तांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:31 AM2018-07-24T10:31:42+5:302018-07-24T10:32:09+5:30
देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणांहून धापेवाडा येथे दिंडी व पालख्या दाखल झाल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणांहून धापेवाडा येथे दिंडी व पालख्या दाखल झाल्या होत्या. विठ्ठल नामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता. शिवाय, काही भाविकांनी चंद्रभागेत आंघोळ करून विठुरायाचे दर्शन घेतले.
पहाटे ५ वाजता तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबाराव कोढे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी धापेवाड्याचे सरपंच डॉ. मनोहर काळे, दिलीप धोटे यांच्यासह भाविक उपस्थित होते. महापूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. शिवाय, ठिकठिकाणांहून दिंडी व पालख्या मंदिर परिसरात दाखल झाल्या होत्या. ‘जय हरी विठ्ठल...’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. सायंकाळपर्यंत अंदाजे एक लाख भक्तांनी विठुरायाचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली. सायंकाळी संत कोलबास्वामी महाराज देवस्थान, संत रघुसंत महाराज मठ, संत मकरंदपुरी महाराज मठ, संत वारामाय मठ येथील दिंड्यांनी एकत्र येऊन नगरभ्रमण केले. येथे विठ्ठलाचे परमभक्त संत श्री कोलबास्वामी महाराज वास्तव्यास होते. त्यांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी येथे प्रगटले होते, असे भाविकांचे म्हणणे आहे. ज्यांना दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही, ते धापेवाड्यात दर्शनासाठी येत असल्याचे अनेकांनी सांगितले.
मंदिर परिसरात याात्रा भरली होती. भाविकांसाठी फराळ व चहाची व्यवस्था केली होती. शिवाय, वैद्यकीय सेवा व पिण्याच्या पाण्याचीही सोय केली होती.
पोलीस बंदोबस्तासाठी सावनेर, कळमेश्वर, काटोल ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. भाविकांसाठी सावनेर, नागपूर, कळमेश्वर बसस्थानकाहून अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या होत्या.