अयोध्येसाठी सिकंदराबाद, काझीपेठसह जालना, नांदेडमधूनही धावणार 'आस्था स्पेशल'

By नरेश डोंगरे | Published: January 20, 2024 05:33 PM2024-01-20T17:33:29+5:302024-01-20T17:33:55+5:30

रामलल्लाचे दर्शन घडविण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेचा पुढाकार : भाविकांना सुविधा, महिनाभर सेवा

'Aastha Special' will also run from Secunderabad, Kazipeth along with Jalna, Nanded to Ayodhya | अयोध्येसाठी सिकंदराबाद, काझीपेठसह जालना, नांदेडमधूनही धावणार 'आस्था स्पेशल'

अयोध्येसाठी सिकंदराबाद, काझीपेठसह जालना, नांदेडमधूनही धावणार 'आस्था स्पेशल'

नागपूर : देशभरातील रामभक्तांना थेट अयोध्येत नेऊन श्रीराम लल्लाचे दर्शन घडविण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आंध्र-तेलंगणातील सिकंदराबाद, काझीपेठसह मराठवाड्यातील नांदेड, जालना रेल्वे स्थानकावरूनही वेगवेगळ्या 'आस्था स्पेशल ट्रेन' सुरू केल्या जाणार आहे. लाखो भाविकांना त्यामुळे अयोध्यावारीचा लाभ घेता येणार आहे.

अयोध्येत निर्माण झालेल्या भव्यदिव्य श्रीराम मंदीरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ती लक्षात घेऊन केंद्र आणि वेगवेगळे राज्य सरकार भाविकांसाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्यावर भर देत आहे. दुसरीकडे रेल्वे बोर्डानेही वेगवेगळ्या भागातून जास्तीच्या ट्रेन सोडण्याचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर, दक्षिण मध्य रेल्वेनेही वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल ९ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले असून, त्यातील ७ गाड्या आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा येथून तर दोन स्पेशल ट्रेन मराठवाड्यातील जालना आणि नांदेड मधून धावणार आहेत.

त्यातील ट्रेन नंबर ०७२२१ सिकंदराबाद - अयोध्याधाम - सिकंदराबाद ही स्पेशल ट्रेन २९ जानेवारीपासून दर एक दिवसाआड २९ फेब्रुवारीपर्यंत धावणार आहे. अर्थात महिनाभरात ती अयोध्याधामच्या १६ फेऱ्या लावणार आहे. त्याच प्रमाणे परतीची गाडी १ फेब्रुवारीपासून दर एक दिवसाआड ३ मार्चपर्यंत धावणार असून ही गाडीसुद्धा १६ फेऱ्या लावणार आहे.

ट्रेन नंबर ७२२३ काझीपेठ अयोध्याधाम काझीपेठ ही स्पेशल ट्रेन ३० जानेवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत दर एक दिवसाआड आणि परतीची गाडी २ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत प्रत्येकी १५ - १५ अशा एकूण ३० फेऱ्या लावणार आहे.

ट्रेन नंबर ७६४९ जालना -अयोध्याधाम - जालना ही विशेष रेल्वेगाडी ४ फेब्रुवारीला जाईल आणि ७ फेब्रुवारीला अयोध्याधाम मधून परत जालना येथे पोहचण्यासाठी निघेल. अशाच प्रकारे ट्रेन नंबर ०७६३६ नांदेड - अयोध्याधाम नांदेेड १४ फेब्रुवारीला अयोध्याधामसाठी निघेल आणि १६ फेब्रुवारीला परतीच्या प्रवासाला प्रारंभ करेल.

या शिवाय ०७२१५ गुंटूर - अयोध्याधाम - गुंटूर, ०७२१६ विजयवाडा - अयोध्याधाम - विजयवाडा, ०७२१७ राजाहमुंद्री अयोध्याधाम - राजाहमुंद्री आणि समलकोट - अयोध्याधाम - समलकोट या स्पेशल ट्रेनसुद्धा प्रवाशांना अयोध्याधामचे दर्शन घडविणार आहेत.

वैदर्भिय भाविकांना पर्वणी

या ९ स्पेशल ट्रेन पैकी चार गाड्यांचा फायदा विदर्भातील रामभक्तांना होणार आहे. कारण सिकंदराबाद (दोन गाड्या) आणि काजिपेठ या विशेष रेल्वेगाड्या बल्लारशाह, चंद्रपूर, सेवाग्राम (वर्धा) आणि नागपूर मार्गे धावणार आहेत. अर्थात या सर्व रेल्वेस्थानकावरून भाविक उपरोक्त गाड्यांमध्ये बसून अयोध्येची वारी करू शकणार आहेत. तर, जालना ही स्पेशल ट्रेन मराठवाड्यातील अनेक रेल्वे स्थानकांसह विदर्भातीलही नमूद स्थानकांवर थांबून प्रवाशांना सामावून घेणार आहे. नांदेड अयोध्याधाम मात्र मराठवाड्यातील पुरणा, परभणी, जालना, औरंगाबादसह, अनकी, मनमाड मार्गे भुसावळ आणि तेथून खंडवा, जबलपूर, माणिकपूर मार्गे प्रयागराज आणि अयोध्याधाम गाठणार आहे.

Web Title: 'Aastha Special' will also run from Secunderabad, Kazipeth along with Jalna, Nanded to Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.