अबब! मागील सहा वर्षात सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला तब्बल १९ कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 07:10 AM2021-11-11T07:10:00+5:302021-11-11T07:10:01+5:30

Nagpur News मागील सहा वर्षात सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना तब्बल १९ कोटींनी गंडा घातल्याची धक्कादायक माहिती आहे.

Abb! In the last six years, cyber criminals have laundered Rs 19 crore to Nagpurites | अबब! मागील सहा वर्षात सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला तब्बल १९ कोटींचा गंडा

अबब! मागील सहा वर्षात सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला तब्बल १९ कोटींचा गंडा

Next

दयानंद पाईकराव

नागपूर : आधुनिक काळात सकाळी दूध, ब्रेड विकत घेण्यापासून तर मोठमोठ्या शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी अनेक जण ऑनलाईन बँकिंगला पसंती देतात. परंतु सायबर गुन्हेगार नेमका याच बाबीचा फायदा घेऊन नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक करतात. मागील सहा वर्षात सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना तब्बल १९ कोटींनी गंडा घातल्याची धक्कादायक माहिती आहे.

दाखल गुन्हे आणि उलगडा
- मागील सहा वर्षात सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्याचे एकूण ७९३ गुन्हे दाखल झालेले आहेत. यात नागपूरकरांना आपले १९ कोटी रुपये गमवावे लागले. यातील २२९ सायबर गुन्हेगारांना नागपूर पोलिसांनी गजाआड केले आहे, तर १५९ आरोपींविरुद्ध न्यायालयात खटले सुरू आहेत. मागील वर्षी २०२० मध्ये सर्वाधिक २४३ गुन्ह्यांंची नोंद करण्यात आली असून, ५३ गुन्ह्यांचा उलगडा करून ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अशी होते ओटीपीच्या माध्यमातून फसवणूक
- सायबर गुन्हेगार आपण बँक अधिकारी बोलत असल्याचे संबंधित नागरिकाला सांगतात. ते एटीएम कार्डचा क्रमांक आणि पासवर्ड मागतात तसेच ऑनलाईन ट्रान्झक्शन करून मोबाईलवर पाठविलेला ओटीपी मागतात. त्यांच्या या जाळ्यात अनेक नागरिक अडकतात. गेल्या सहा वर्षात ओटीपी शेअर करून रक्कम गमविल्याचे तब्बल ३२ गुन्हे घडले आहेत. यात नागरिकांची आठ कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे.

ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून फसवणूक

- मागील सहा वर्षात ऑनलाईन बुकिंगचे ३५ गुन्हे दाखल झाले असून, यात ८६ लाखांनी नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. ऑनलाईन फसवणुकीत ८२ गुन्ह्यात दोन कोटी, क्रेडिट-डेबिट कार्ड फसवणुकीच्या ६३ गुन्ह्यात ६० लाख, बँकिंग फसवणुकीच्या ६५ गुन्ह्यात एक कोटींनी फसवणूक केल्याची नोंद सायबर पोलीस ठाण्यात झाली आहे.

महिन्याला २९० गुन्हे
- नागपूर शहरात महिन्याला सायबर गुन्हेगारीचे २९० गुन्हे दाखल होतात. सन २०२० या वर्षात एकूण ४,२३४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तर २०२१ या वर्षात ३१ ऑक्टोबरपर्यंत सायबर गुन्हेगारीचे २,९०० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

ऑनलाईन व्यवहार करा पण जपून

सायबर गुन्हे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी नागपूर पोलिसांकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात येते. सोशल मीडियावर, सावधानगिरीबाबत पोस्ट टाकण्यात येतात. ऑनलाईन सेमिनार, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यासोबतच प्रसारमाध्यमांच्या मार्फत सायबर फसवणुकीबाबत माहिती प्रकाशित करण्यात येते. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी सायबर गुन्हेगारी रोखण्यात यश आले आहे. तरीसुद्धा ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी जपून व्यवहार करावा.
- केशव वाघ, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, नागपूर

..............

Web Title: Abb! In the last six years, cyber criminals have laundered Rs 19 crore to Nagpurites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.