अबब! दाताला कीड लागलेले २ लाखांवर रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 12:50 PM2022-02-05T12:50:10+5:302022-02-05T13:11:54+5:30
मागील सहा वर्षांत एकट्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात दाताला कीड लागलेले २ लाख २३ हजार ७९६ रुग्ण आढळून आले. यामुळे दातांच्या कीडेला रोखण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत जंकफूडसोबतच गोड व चिकट पदार्थ खाण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. परिणामी, दातांमध्ये कीड लागण्याचा व हिरड्याच्या आजारात वाढ झाली आहे. मागील सहा वर्षांत एकट्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात दाताला कीड लागलेले २ लाख २३ हजार ७९६ रुग्ण आढळून आले. यामुळे दातांच्या कीडेला रोखण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
दातांची निगा कशी राखावी, दात कसे स्वच्छ करावेत, याबाबत अनेकांमध्ये आजही अज्ञान आहे. दाताला कीड लागण्याची सुरुवात लहानपणापासूनच होते. रात्री बाळाला बाटलीतून दूध देण्याकडे पालकांचा अधिक ओढा असतो. त्या वेळी ते रात्रभर तोंडात साखर राहिल्याने कीड तयार होते. दात कीडणे म्हणजे दातांचे विघटन करणारा तोंडातील विशिष्ट जिवाणूंमुळे होणारा आजार आहे. योग्य पद्धतीने ब्रश न केल्यामुळे हेच जीवाणू तोंडात वाढत जातात आणि ‘प्लाक’ तयार करतात. हळूहळू हे जिवाणू प्लाकमध्ये जमा होतात. त्यानंतर ‘टार्टर’तयार होतो. यामुळे हिरड्यांचे आजार होतात. शासकीय दंत रुग्णालयात या दोन्ही आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे.
-दातांमधील कीडचे ६५ टक्के रुग्ण
शासकीय दंत रुग्णालयात २०१६ ते २०२१ दरम्यान ३ लाख ३९ हजार ९७९ रुग्ण उपचारासाठी आले. यातील दातांमध्ये कीड लागलेले ६५ टक्के म्हणजे, २ लाख २३ हजार ९७९ रुग्ण आहेत. २०१६ मध्ये रुग्णालयात या आजाराचे ४९ हजार ५११, २०१७ मध्ये ४५ हजार ७५८, २०१८ मध्ये ४६ हजार ५६५, २०१९ मध्ये ४७ हजार २४३, २०२० मध्ये कोरोनामुळे रुग्ण कमी झाली तरी १५ हजार ७५८ तर २०२१ मध्ये १८ हजार ९६१ रुग्ण उपचारासाठी आले.
- हिरड्यांच्या आजाराचे २८ टक्के रुग्ण
रुग्णालयात मागील सहा वर्षांत हिरड्यांच्या आजाराचे २८ टक्के म्हणजे, ९६ हजार २२४ रुग्ण आले. यात २०१६ मध्ये २१ हजार ९९९, २०१७ मध्ये २० हजार ४७६, २०१८ मध्ये १६ हजार ९८५, २०१९ मध्ये २० हजार २५१, २०२० मध्ये ४ हजार ४१८ तर २०२१ मध्ये २० हजार ९५ रुग्ण उपचारासाठी आले.
-लहानपणापासूनच मुलांच्या दातांकडे लक्ष हवे
दातांची निगा राखण्याबाबत पालकांमध्ये फारशी जागृती नाही. त्यामुळे मुलांच्या दातांकडे दुर्लक्ष होते. पालकांनी मुलांच्या दातांच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास दात स्वच्छ राहण्याबरोबर ते मजबूत राहतात. दातांची कीड लागू नये यासाठी विविध साध्यासोप्या उपाययोजना पालकांसह मुलांनी करायला हव्यात. याचे प्रशिक्षण देण्यासाठी शासकीय दंत रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी बाह्यरुग्ण विभागात दंत शिबिर व समन्वय केंद्र सुरू केले आहे.
-डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय