आबा, दाजी, तात्याही दिसणार ईव्हीएमवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:31 PM2019-12-27T22:31:47+5:302019-12-27T22:33:04+5:30

टोपण नाव आतापर्यंत निवडणुकीत अधिकृत नव्हते. पण यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी टोपण नाव ईव्हीएमवर दिसण्याची सोय उपलब्ध केली आहे.

Abba, Daji, will also appear on EVM | आबा, दाजी, तात्याही दिसणार ईव्हीएमवर

आबा, दाजी, तात्याही दिसणार ईव्हीएमवर

Next
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाने उमेदवारांच्या टोपण नावाची करून दिली सोय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अख्खा महाराष्ट्र आबा, बाबा म्हणून ओळखतो. असे अनेक नेते, मंत्री, राजकारणी आहेत जे त्यांच्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. हे टोपण नाव आतापर्यंत निवडणुकीत अधिकृत नव्हते. पण यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी टोपण नाव ईव्हीएमवर दिसण्याची सोय उपलब्ध केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ज्या उमेदवारांना आपले टोपण नाव, उपनाव, विशेष नाव ईव्हीएमवर छापण्याची इच्छा आहे, त्या उमेदवारांनी मागणी केल्यास निवडणूक आयोग त्यांची मागणी पूर्ण करणार आहे.
ग्रामीण भागामध्ये टोपण नावाचा वापर लहानपणापासून होतो. पुढे ते व्यक्तिमत्त्व त्या टोपण नावाने ओळखल्या जाते. ग्रामीण भागामध्ये अशी अनेक उदाहरणे आहे, ज्यांना तात्या, अण्णा, दादा, मामा, दाजी, आबा या नावाने पुकारले जाते. याच नावाने त्यांना अख्खे गावही ओळखते. गावात अशा टोपण नावाने प्रसिद्ध असलेली मंडळी जेव्हा राजकारणात उतरतात तेव्हा प्रचारात अथवा ईव्हीएमवर त्यांना आपले मूळ नावच नमूद करावे लागते. पण यंदा राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जे उमेदवार उभे आहे. त्यांना टोपण नावाने गावात ओळखले जाते. अशा उमेदवारांना त्यांच्या मूळ नावाबरोबरच टोपण नाव सुद्धा मतपत्रिकेवर, ईव्हीएम मशीनवर नमूद करण्याची सोय आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने २६ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, काही वेळा संबंधित उमेदवार त्यांच्या मतदार संघात काही विशेष नाव, उपनाव व टोपण नावाने ओळखले जातात. अशावेळी उमेदवारांकडून भरण्यात येणाऱ्या नामनिर्देशनपत्रात लिहिलेल्या नावाच्या व्यतिरिक्त विशेष नाव मतपत्रिकेवर छापण्याची इच्छा आहे त्या उमेदवारांनी लेखी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे करावी.
यासाठी आयोगाने एक अर्ज सोबत दिला आहे. तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नावाने आहे. त्यात मतपत्रिकेवर काय नाव छापावे याचा बॉक्स दिला आहे. तो बॉक्स इंग्रजी आणि मराठीतून भरून द्यायचा आहे. हा अर्ज भरून दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी त्या उमेदवाराची योग्य खातरजमा करणार आहे. विशेष म्हणजे हा अर्ज नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे.

कळमेश्वरच्या तहसीलदारांनी तयार केला उमेदवारांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप
जि.प. व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कुठलीही माहिती, निवडणूक विभागाचे परिपत्रक, वेळापत्रक आदी माहिती तात्काळ देता यावी यासाठी कळमेश्वरचे तहसीलदार सचिन यादव यांनी सर्व उमेदवारांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप तयार केला आहे. या ग्रूपमध्ये निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. तहसीलदारांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे सर्व उमेदवारांना आवश्यक ती माहिती वेळेत मिळण्यास मदत होत आहे.

Web Title: Abba, Daji, will also appear on EVM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.