१३ वर्षीय हिमोफिलिया रुग्णाचा पोटात रक्तस्त्राव

By सुमेध वाघमार | Published: May 31, 2024 07:07 PM2024-05-31T19:07:03+5:302024-05-31T19:07:27+5:30

मेयोच्या डॉक्टरांनी वाचविला जीव : रक्त गोठण्यासाठी लागणाऱ्या फॅक्टरसाठी धावाधाव

Abdominal bleeding in a 13-year-old hemophilia patient | १३ वर्षीय हिमोफिलिया रुग्णाचा पोटात रक्तस्त्राव

Abdominal bleeding in a 13-year-old hemophilia patient

नागपूर : हिमोफिलियाचा १३ वर्षीय रुग्णाचा पोटात रक्तस्त्राव झाला. त्याचे हिमोग्लोबीन कमी होऊन श्वास घ्यायलाही त्रास होत होता. अशा गंभीर स्थितीत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) तो दाखल झाला. येथील डॉक्टरांनी तातडीनेच उपचाराला सुरुवात केली. सोबतच, रक्त गोठण्यासाठी लागणाºया ‘फॅक्टर’साठी धावपळही केली. अखेर सर्वांच्या प्रयत्नाने मुलाचा जीव वाचला. 
 

‘ईशान’ त्या मुलाचे नाव. पाच वर्षाचा असताना त्याला हिमोफिलिया आजार असल्याचे निदान झाले. या आजरात रक्त गोठण्याची प्रक्रिया सामान्य वेळेपेक्षा उशिराने होत असल्याने जीवाचा धोका निर्माण होतो. १९ मे रोजी ईशान पोट दुखी व श्वास घेताना त्रास होत असल्याची तक्रार घेऊन मेयोत दाखल झाला. औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी त्याची सोनोग्राफी केल्यावर पोटात रक्तस्त्राव होत असल्याचे व ४०० एमएल रक्त जमा झाल्याचे निदान केले.

 

त्यांनी तातडीने अतिदक्षता विभागात भरती केले. पोटातील रक्तस्त्राव बंद करण्यासाठी ‘फॅक्टर ८’ देणे गरजेचे होते. परंतु ‘फॅक्टर’चा वितरणाची जबाबदारी असलेल्या डागा रुग्णालयात ते उपलब्ध नव्हते. डॉक्टरांनी आपल्या स्तरावर प्रयत्न केले. हिमोफिलिया सोसायटीच्या डॉ. अंजू मेहरोत्रा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने २ हजार युनिट फॅक्टर मोफत दिले. दुसºया दिवशी पुन्हा डॉ. मेहरोत्रा यांनी १ हजार युनिट फॅक्टर दिले. मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनीही पुढाकार घेत पॅथोलॉजीचे डॉ. बलवंत कोवे यांना महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतून सर्व चाचण्या मोफत करण्यास सांगितले. सर्वांच्या प्रयत्नाने शस्त्रक्रिया न करता ‘ईशान’ला मृत्यूचा धोक्यातून बाहेर काढले. या उपचारात नॅशनल कॅन्सर इन्स्टीटयूटचे डॉ. केतन मोडक यांचेही मार्गदर्शन मोलाचे ठरले. पुढील उपचारासाठी ईशानला एम्समध्ये पाठविले. १२ दिवसांच्या उपचारानंतर त्याला शुक्रवारी रुग्णालयातून सुटी मिळाली. घरी जाताना त्याच्या व आई-वडिलांचा चेहºयावरील आनंद पाहून डॉक्टरांना आपल्या कामाची पावती मिळाली. 

 

या डॉक्टरांच्या प्रयत्नांना आले यश
मेयोचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शेंडे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांच्यासह मेडिसीन विभागाच्या प्रमुख डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. राखी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रवीण सलामे, डॉ. सजल बंसल, डॉ. दिव्या पाठीपखा, डॉ.नितीन भुरे, डॉ. अजहर पटेल, डॉ. मयंक जोशी, डॉ. संदीप, डॉ सुकुमार, डॉ. श्रीनिधी, डॉ लोकेश लोढी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. 

 

शासकीय रक्तपेढीत ‘फॅक्टर’ची गरज
मेयो, मेडिकलमध्ये हिमोफिलियाचे अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेले ‘फॅक्टर ८ व ९’ गरज असते. ते वेळेत उपलब्ध न झाल्यास मृत्यूचा धोका उद्भवतो. शासनाने याला गंभीरतेने घेऊन शासकीय रक्तपेढीत हे फॅक्टर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

Web Title: Abdominal bleeding in a 13-year-old hemophilia patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.