नागपुरात १० लाखांच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 07:59 PM2019-09-30T19:59:19+5:302019-09-30T20:05:48+5:30
१० लाखांच्या खंडणीसाठी दोन गुंडांनी एका डॉक्टरचे अपहरण केले. त्यांना त्यांच्याच कारमध्ये कोंबून चाकू मारला. रोख आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आणि दोन तासानंतर सोडून दिले.हे अपहरणनाट्य सक्करदरा ते सेंट्रल एव्हेन्यूवर घडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १० लाखांच्या खंडणीसाठी दोन गुंडांनी एका डॉक्टरचेअपहरण केले. त्यांना त्यांच्याच कारमध्ये कोंबून चाकू मारला. रोख आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आणि दोन तासानंतर सोडून दिले. एखाद्या सिनेमातील वाटावे असे हे अपहरणनाट्य रविवारी रात्री ९.४५ ते ११. ४५ या वेळेत सक्करदरा ते सेंट्रल एव्हेन्यूवर घडले.
डॉ. केदार शरद जोशी (वय ५०) असे पीडित डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे सक्करदऱ्यात उमरेड मार्गावरील ताजश्री टॉवरमध्ये एक्स-रे आणि सोनोग्राफी क्लिनिक आहे. रविवारी सर्व कामकाज आटोपल्यानंतर त्यांनी त्यांचा कर्मचारी योगेश इंगोलेला आपल्या डस्टर कारमध्ये टिफीन ठेवण्यास सांगितले. रात्री ९.४५ वाजता जोशी घरी जाण्यासाठी आपल्या डस्टर कारजवळ (एमएच ४९/बी ३७०२) आले. कारचे दार उघडताच आरोपी रोशन अशोक राऊत (वय ३०,रा. गौरव अपार्टमेंट, गजानन शाळेसमोर, न्यू सुभेदार ले-आऊट), जुगनू ऊर्फ प्रीतम ज्ञानेश्वर वानखेडे (वय ३०, रा. संजय गांधीनगर, हुडकेश्वर) या दोघांनी डॉ. जोशींना त्यांच्या कारच्या मागच्या सीटवर ढकलले. एकाने लगेच ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेत कार पुढे काढली. डॉ. जोशींनी ओरडण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्याने जवळचा चाकू काढून त्यांच्या नाकावर मारला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, दोन अंगठ्या तसेच पर्समधील ४० हजार रुपये हिसकावून घेतले.
१० लाख दे अन्यथा ठार मारू
आरोपी डॉ. जोशींना त्यांच्याच कारमध्ये इकडे-तिकडे दोन तास फिरवत होते. १० लाख रुपये द्या, अन्यथा रायपूर(छत्तीसगड)मध्ये नेऊन ठार मारू, अशी धमकी आरोपी देत होते. जोशी यांनी आरोपींना आपल्याकडे रक्कम नसल्याचे पटवून दिल्यानंतर आरोपींनी रात्री ११.४५ च्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील साबू हॉस्पिटलसमोरच्या गल्लीत सोडले. त्यानंतर कार सोडून आरोपी पळून गेले.
पोलिसांची धावपळ
आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर डॉ. जोशी सक्करदरा पोलिसांकडे पोहचले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी अपहरण आणि लुटमारीचा गुन्हा दाखल केला. लगेच घटनास्थळ गाठून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत दोन्ही आरोपींना सोमवारी पहाटे अटक केली.