नागपुरात अल्पवयीन मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:13 PM2020-06-09T23:13:43+5:302020-06-09T23:15:53+5:30
१५ वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलगा तसेच त्याला घेऊन जाणारा आरोपी राजकुमार गणेश चौधरी (वय ३६, रा. न्यू बाबुळखेडा) याचा पोलीस शोध घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १५ वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलगा तसेच त्याला घेऊन जाणारा आरोपी राजकुमार गणेश चौधरी (वय ३६, रा. न्यू बाबुळखेडा) याचा पोलीस शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरसंसार सोसायटीमध्ये दुर्गामाता मंदिराजवळ रिनाबाई तुकाराम शाहू (वय ३०) राहतात. त्यांचा १५ वर्षीय मुलगा विकास ऊर्फ पिंटू याला आरोपी चौधरी नेहमी कामाला घेऊन जायचा. १ जूनला त्याने पहाटेच्या वेळी त्यांच्या घरी येऊन पिंटूला कामावर नेतो, रात्रीपर्यंत परत घेऊन येईल, असे सांगून घरून नेले. मात्र आठ दिवस झाले तरी आरोपी चौधरी याने पिंटूला घरी आणून दिले नाही. आरोपीचा मोबाईलही बंद आहे. त्यामुळे घाबरलेल्या रिनाबाई शाहू यांनी पारडी पोलिसांकडे सोमवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी चौधरी तसेच त्याच्या ताब्यात असलेल्या पिंटूचा पोलीस शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे, यापूर्वी अनेकदा आरोपीने पिंटूला कामाच्या बहाण्याने सोबत नेले आहे. मात्र नेहमी तो त्याला घरी परत आणायचा. यावेळी आठ दिवस झाले तरी त्याने पिंटूला परत आणले नाही आणि त्याचा मोबाईलही बंद आहे. आरोपी त्याच्या घरीदेखील नाही. त्यामुळे सर्वांच्या जीवाची धाकधूक वाढली आहे.