अपहरणकर्त्या आरोपीस अटक
By admin | Published: April 14, 2016 03:22 AM2016-04-14T03:22:12+5:302016-04-14T03:22:12+5:30
नऊ वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस जलालखेडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.
नऊ वर्षीय मुलीचे अपहरण : रोहणा येथील घटना, जलालखेडा पोलिसांची यशस्वी कामगिरी
जलालखेडा : नऊ वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस जलालखेडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. दरम्यान, अपहृत मुलगी मिळताच तिच्या आईने सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना जलालखेडा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रोहणा येथे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
सिद्धार्थ ढोणे (२२, रा. जोगीनगर, नागपूर) असे अपहरणकर्त्या आरोपीचे नाव आहे. जलालखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रोहणा येथे प्रतिभा सतीश मेश्राम (२९) ही आपल्या दोन मुली खुशी (९) व कशिश (७) यांच्यासह वास्तव्यास असून ती मोलमजुरीचे काम करते. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास प्रतिभा बँकेच्या कामानिमित्त भारसिंगी येथे गेली होती. त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास ती घरी परतली असता, खुशी घरात नव्हती. त्यामुळे प्रतिभाने कशिश व शेजाऱ्यांकडे विचारपूस सुरू केली. दरम्यान, शेजारी राहणारे रामू ढोणे यांच्या घरी पाहुणा म्हणून आलेला सिद्धार्थ ढोणे हा खुशीला आंबे तोडण्यासाठी म्हणून शेताकडे घेऊन गेल्याची माहिती शेजाऱ्यांनी प्रतिभाला दिली. लागलीच गावातील नागरिकांच्या मदतीने प्रतिभाने शेतशिवारात खुशी व आरोपी सिद्धार्थचा शोध घेतला. खुशीचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जलालखेडा पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाबाबत तक्रार दाखल केली.
घटनेची माहिती मिळताच जलालखेड्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी दोन पथके तयार करून खुशीची शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, पोलिसांना काटोल-नागपूर ९५९२ क्रमांकाच्या एसटी बसमध्ये एक संशयित युवक दारू पिऊन असून त्याच्यासोबत एक छोटी मुलगी असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. यावरून जलालखेडा पोलिसांनी सदर एसटीचा पाठलाग केला. प्रारंभी सदर बसने कळमेश्वर ओलांडल्यानंतर गिट्टीखदान नागपूर पोलिसांना सूचना देऊन नाकाबंदी करण्यास लावले. गिट्टीखदान पोलिसांनी सदर बस थांबवून आरोपी सिद्धार्थ ढोणे व अपहृत मुलीला जलालखेडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
खुशीच्या अपहरणापासून केवळ ४ ते ५ तासांत जलालखेडा पोलिसांनी आरोपीला अटक केली. खुशी सुखरूप परतताच तिची आई प्रतिभा हिने सुटकेचा नि:श्वास सोडला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात जलालखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, उपनिरीक्षक विजय कोरडे, सहायक फौजदार गणपत जाधव, हेड कॉन्स्टेबल संजय इंगोले, दिलीप इंगळे, कृणाल आरगुडे, श्रीनिवास वाघ, मंगेश नासरे, पोलीस मित्र रूपेश चौधरी, प्रवीण मेश्राम आदींनी यशस्वीपणे बजावली. (प्रतिनिधी)
दोन पथकांद्वारे
शोधमोहीम
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जलालखेड्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी तत्काळ पोलिसांची दोन पथके केली. दोन्ही पथकांनी रोहणा परिसरातील पारडसिंगा, काटोल, भारसिंगी आदी भागातील शेती, जंगल, नदी-नाले परिसर पिंजून काढले. मात्र त्यांना आरोपीबाबत कुठेही माहिती मिळाली नाही.
आरोपीचा शोध घेण्यास अडचणी
आरोपी सिद्धार्थ ढोणे हा जोगीनगर, नागपूर येथील रहिवासी असूनन तो सतत बेवारस फिरत राहतो. ५-६ दिवसांपूर्वी रोहणा येथील रामू ढोणे यांच्याकडे तो पाहुणा आला होता. तो कुठेही मूळ ठिकाणी राहत नसून ६-८ महिन्यांमधून नातेवाईकांकडे येतो. तीन-चार दिवस मुक्काम ठोकला की, निघून जातो. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांकडे त्याचा फोटो, मोबाईल क्रमांक, कायमचा पत्ता मिळत नसल्याने आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यातही पोलिसांनी आरोपीला जेरबंद करीत शोधमोहीम फत्ते केली.
पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग
खबऱ्यामार्फत एका संशयित युवकाबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी तपासचक्रे वेगाने हलविली. काटोल-नागपूर या ९५९२ क्रमांकाच्या एसटी बसला पकडण्यासाठी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. प्रारंभी पोलिसांनी कळमेश्वर पोलिसांना नाकांबदी करण्याची सूचना दिली. मात्र, सदर बस कळमेश्वर ओलांडून नागपूरकडे रवाना झाल्याचे समजताच, पोलिसांनी एसटी नागपुरात पोहचण्यापूर्वीच गिट्टीखदान पोलिसांची मदत मागितली. लागलीच गिट्टीखदान पोलिसांनी नाकाबंदी लावून सदर बसला अडविले. बसमधील आरोपी सिद्धार्थ ढोणे व अपहृत मुलीला ताब्यात घेतले. लागलीच जलालखेडा पोलीसही तेथे पोहोचले व आरोपी व मुलीला ताब्यात घेतले.