चंबळच्या खोऱ्यातील आभासची आईवडीलांसोबत घरवापसी
By नरेश डोंगरे | Published: January 11, 2024 06:15 PM2024-01-11T18:15:37+5:302024-01-11T18:15:54+5:30
नागपूर : चंबळच्या खोऱ्यात एका छोट्याशा गावात राहणारा आणि क्रिकेटच्या प्रेमापोटी घर सोडून मुंबईकडे धाव घेणारा १२ वर्षीय आभास ...
नागपूर : चंबळच्या खोऱ्यात एका छोट्याशा गावात राहणारा आणि क्रिकेटच्या प्रेमापोटी घर सोडून मुंबईकडे धाव घेणारा १२ वर्षीय आभास (काल्पनिक नाव) अखेर त्याच्या गावाकडे परतला. काहीशी फिल्मी वाटणारी ही घटना मंगळवारी उघडकीस आली होती.
भिंड (मुरैना) जिल्ह्यातील आभासला धोनी-विराट सारखे क्रिकेट किंग व्हायचे होते. मात्र, त्यापोटी तो शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत असल्याने आईवडील त्याला रागावत होते. परिणामी त्याने क्रिकेट किंग होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रविवारी भल्या सकाळी गाव सोडले. तो मुरैना रेल्वे स्थानकावर आला. तेथून ग्वाल्हेरला पोहचला आणि नंतर तेलंगणा एक्सप्रेसने नागपुरात मंगळवारी दुपारी पोहचला. येथून रेल्वेने मुंबईला जाण्याची त्याची योजना होती. मात्र, तो घरून बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आईवडीलांनी मुरैना पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर एमपी पोलिसांनी लगेच सर्वत्र अलर्ट दिला. त्यावरून तत्परता दाखवत रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा काशिद यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आभासचा शोध सुरू केला. दुपारी ३.३० सुमारास नागपूर स्थानक परिसरात भटकणाऱ्या आभासला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर एमपी पोलीस तसेच त्याच्या आईवडिलांसोबत संपर्क करून त्यांना आभासला परत नेण्यासाठी नागपुरात येण्यास सांगितले. त्यानुसार, बुधवारी दुपारी मुरैना पोलीस आणि आभासचे आईवडील नागपुरात आले. त्यांनी बाल कल्याण समिती तसेच पोलिसांकडून कागदोपत्री औपचारिकता पूणर केल्यानंतर आभासला ताब्यात घेतले.
कावरा बावरा आभास
गेल्या चार दिवसांपासून घर, गाव आणि कुटुंबियांपासून दूर आलेल्या आभासची स्थिती कावरीबावरी झाली होती. त्याच्या पालकांचीही तीच स्थिती होती.
बुधवारी आईवडील दिसताच त्याच्या भावनांचा बांध फुटला. आईवडिलांना बिलगुन त्याने चुकीची कबुली दिली. त्यानंतर त्याची आईवडिलांसोबत घरवापसी झाली.