अभाविप २०० ठिकाणी राबविणार ‘एक वस्ती एक तिरंगा’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:12 AM2021-08-12T04:12:18+5:302021-08-12T04:12:18+5:30
नागपूर : ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे नागपुरातील २०० जागी ‘एक वस्ती एक तिरंगा’ अभियान ...
नागपूर : ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे नागपुरातील २०० जागी ‘एक वस्ती एक तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असेल.
अभाविपतर्फे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचे अखिलेश भारतीय तसेच नागपूर महानगर पदाधिकारी माधुरी कुर्जेकर, केतकी पाठे, अथर्व सगदेव, गौरव बुरडे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. भारताचा गौरवशाली इतिहास नवीन पिढीसमोर जाण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात विविध भागातील वस्त्यांमध्ये जाऊन विविध कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. त्यात भारत माता पूजन, वीर माता पूजन आणि माता सैनिक सत्कार यांचा समावेश असेल.
विदर्भ प्रांतात एक हजार ठिकाणी आयोजन
अभाविपच्या विदर्भ प्रांतातर्फे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे आयोजन करण्यात येईल. तसेच या वर्षभरात ७५ दिवस देशासाठी, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा, स्वातंत्र्यसैनिकाच्या घरी भेट, साहित्य उत्सव, भारत माता पालखी सोहळा, वीर माता सत्कार, सायकल यात्रा, फ्लॅश मॉब, व्याख्यान, अखंड तिरंगा यात्रा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.