अभय घुसे यांनी घडविला ‘ब्रह्मांड नायक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:45 AM2017-08-31T01:45:35+5:302017-08-31T01:46:09+5:30
अभय घुसे. शिक्षण-केवळ नववी. मूर्ती सजावटीचे कुठलेही तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले नाही. परंतु त्यांनी घडविलेल्या मूर्ती इतक्या कल्पक आहेत की बॉलिवूडचे अनेक नामांकित तारे त्यांच्या कलेच्या प्रेमात पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभय घुसे. शिक्षण-केवळ नववी. मूर्ती सजावटीचे कुठलेही तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले नाही. परंतु त्यांनी घडविलेल्या मूर्ती इतक्या कल्पक आहेत की बॉलिवूडचे अनेक नामांकित तारे त्यांच्या कलेच्या प्रेमात पडले आहेत. अशा या प्रतिभावंत कलाकाराने यंदाच्या गणेशोत्सवात ‘ब्रह्मांड नायक’ साकारला असून १११ शुभ्र रत्नांची ही कलाकृती सध्या शहरात चर्चेचा विषय बनली आहे. अभय घुसे हे कोराडी नाक्यावर राहतात. कलेच्या या क्षेत्राकडे वळण्याआधी ते एका ज्वेलर्सकडे काम करायचे. तेथील सोन्याच्या दागिन्यांची नक्षी त्यांना कायम खुणावत असायची. ही नक्षी डोक्यात साठवून त्यांनी एक दिवस घरीच ताब्यांच्या दागिन्यांना आकार दिला. त्यांच्या कल्पकतेला दाद मिळू लागली. एका कुटुंबाने त्यांना साईबाबांचे मुकुट बनवायला सांगितले. ते इतके अप्रतिम झाले की त्यांना अशी डिझाईनची कामे सातत्याने मिळू लागली. त्यांच्या कल्पकतेची वार्ता लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी अभय घुसे यांच्याकडून खास अमिताभ बच्चन यांच्यासाठी गणेशाची मूर्ती सजवून घेतली व यवतमाळ येथे झालेल्या लोकमत युवा मंचच्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात ती अभय घुसे यांच्या उपस्थितीतच अमिताभ बच्चन यांना भेट दिली. ही घटना घुसे यांच्यासाठी टर्निंग पॉर्इंट ठरली.
घुसे यांना कलेच्या क्षेत्रात विशेष ओळख लाभली आणि पुढे हेमामालिनी यांनी त्यांच्याकडून खास साईबाबांची मूर्ती बनवून घेतली. राजबब्बर यांनीही साईबाबाच्या मूर्तीची आॅर्डर दिली. सनी देओलने एक खास ट्रॉफी घडवून घेतली. विजय दर्डा यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक मधूर भांडारकर यांना भेट देण्यासाठी घुसे यांच्याकडून खास राधाकृष्णची मूर्ती बनवून घेतली. मूर्तिकलेच्या क्षेत्रातील या १५ वर्षांच्या प्रवासात घुसे यांनी असे अनेक कॉर्पोरेट गिफ्ट तयार केले आहेत ज्यांना देशभरात मोठी मागणी लाभली आहे.
याचे श्रेय लोकमतलाच
माझी आज जी ओळख आहे त्याचे संपूर्ण श्रेय लोकमत व विजय दर्डा यांनाच आहे. त्यांनीच माझ्यातील कलाकाराला प्रोत्साहन दिले. लोकमतबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी साकारलेला ‘ब्रह्मांड नायक’ लवकरच मी विजय दर्डा यांना भेटस्वरूप देणार आहे. या मूर्तीत लाकडापासून बनवलेले स्वर्णमुद्रेचे सिंहासन आहे. सोबतच अमिताभ यांच्या आवाजातील गणेशाची आरतीही यात ऐकता येते.