भाजपच्या बालेकिल्ल्यात वंजारींची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:13 AM2020-11-25T11:13:00+5:302020-11-25T11:14:15+5:30

Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांनी मोठ्या जोशाने दंड थोपटले होते. मात्र प्रत्यक्ष प्रचारात त्यांची प्रचंड दमछाक होत आहे.

Abhijit Vanjari suffocates in BJP's stronghold | भाजपच्या बालेकिल्ल्यात वंजारींची दमछाक

भाजपच्या बालेकिल्ल्यात वंजारींची दमछाक

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस नेत्यांमधील मतभेदाचा बसतोय फटकामतदारांपर्यंत थेट ‘कनेक्ट’ नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांनी मोठ्या जोशाने दंड थोपटले होते. मात्र प्रत्यक्ष प्रचारात त्यांची प्रचंड दमछाक होत आहे. कॉंग्रेसमधील गटबाजीमुळे त्यांना मतदारांपर्यंत अद्यापही थेट ‘कनेक्ट’ करण्यात यश आलेले नाही. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांच्यासाठी दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील कार्यकर्त्यांपर्यंतची फौज कामाला लागली आहे. अगदी शेवटच्या मतदारापर्यंत ते पोहोचत असून वंजारी ‘बॅकफूट’वर गेल्याचे चित्र आहे.

निवडणुकीला दीड ते दोन वर्षे बाकी असतानापासूनच भाजपतर्फे मतदारनोंदणीला व संपर्काला सुरुवात झाली होती. उमेदवार निश्चित नव्हता, मात्र मतदारांपर्यंत पक्ष कार्यकर्ते पोहोचले होते. दुसरीकडे काँग्रेसकडून याबाबतीत उदासीनता होती. पक्षपातळीवर मतदार नोंदणीसाठी फारसा पुढाकार घेण्यात आला नाही. मतदारसंघातील सहा जिल्ह्यांतील काँग्रेस नेत्यांची पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे १० दिशांना तोंडे आहेत. त्यामुळे नेते केवळ मंचावर दिसून येतात मात्र मतदार नोंदणीत त्यांचा कुठलाही सहभाग नव्हता. शिवाय सभा किंवा बैठक संपली की नेते घरी किंवा इतर कामांसाठी रवाना होतात. भंडारा, गोंदियात भाजपची पकड मजबूत झालेली दिसते, तर गडचिरोली व चंद्रपूरमध्ये वंजारींचा जोर फारसा दिसत नाही.

प्रचार रिंगणातून शिवसेना गायब

अभिजित वंजारी हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. परंतु काँग्रेस नेते केवळ औपचारिकता म्हणून नावापुरता त्यांचा प्रचार करत आहेत. राष्ट्रवादीचे अनेक तरुण कार्यकर्ते तर पक्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शहराबाहेर आहेत. दुसरीकडे पदवीधरच्या मैदानात शिवसेनेची बाजू कमकुवत आहेच. काही नेत्यांनी सभांना उपस्थिती दाखविली. परंतु कार्यकर्ते कुठेही वंजारी यांच्यासाठी प्रचारात दिसलेले नाहीत.

नागपूरवर ‘फोकस’ कसा करणार?

पदवीधर मतदारसंघात अर्ध्याहून अधिक मतदार नागपुरातील आहेत. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदारांची फौज प्रचाराच्या रिंगणात उतरली आहे. मनपातील भाजपचे १०८ नगरसेवक गल्लीबोळात प्रचाराला लागले आहे. दुसरीकडे कॉंग्रेस गटबाजीने त्रस्त असल्याचे दिसते. मेळाव्यात कधी एक नेता असतो तर दुसरा नसतो असे चित्र आहे. भाजपकडून विविध माध्यमांतून प्रत्यक्ष या मतदारांपर्यंत दोन ते तीन वेळा संपर्क झाला आहे. मात्र काँग्रेसची बाजू त्या तुलनेत कच्ची आहे.

महाविद्यालयातील प्राध्यापकच वंजारींच्या विरोधात

अभिजित वंजारी यांच्याच महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक असलेले डॉ. विनोद राऊत हेदेखील पदवीधरच्या रिंगणात आहेत. पदवीधरांचे प्रश्न न जाणणारे लोक त्यांना न्याय कसा देणार, या विचारातून राऊत यांनी उमेदवारी दाखल केली. वंजारी यांच्या संस्थेत कार्यरत असल्याने मी दोन ते तीन वेळा उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याची माहिती दिली. मात्र कुठलेही उत्तर मिळाले नाही. थोड्या फार प्रमाणात अप्रत्यक्षपणे दबाव येत आहे, असे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविद्यालयातील अनेक कर्मचारीदेखील वंजारी यांच्याविरोधात असून त्यांनी डॉ. राऊत यांना पाठिंबा दिला आहे.

Web Title: Abhijit Vanjari suffocates in BJP's stronghold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.