नागपुरात तृतीयपंथियांसह समलैंगिक नागरिकांसाठी ‘अभिनव घरकुल’ योजना'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 10:10 PM2022-03-23T22:10:57+5:302022-03-23T22:16:01+5:30
Nagpur News प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर नासुप्रने चिखली परिसरात अभिनव घरकुल योजनेंतर्गत तीन इमारतीत २५२ घरकुलांचे बांधकाम केले आहे. येथे तृतीपंथीयांना सामावून घेण्याचा विचार आहे.
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास शहरातील तृतीयपंथीयांना सवलतीच्या दरात घरकुल योजना राबवीत आहे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दुर्बल घटकातील लाभार्थींना मिळणाऱ्या अनुदानासोबत समाजकल्याण विभागाकडूनही अनुदान मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे. चिखली परिसरात उभारण्यात आलेल्या २५२ घरकुलांचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे.
शहरात उभारण्यात आलेल्या इमारतील स्थानिक नागरिकांचा तृतीपंथीयांना घरकुल वाटप करण्याला विरोध होतो. याचा विचार करता प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर नासुप्रने चिखली परिसरात अभिनव घरकुल योजनेंतर्गत तीन इमारतीत २५२ घरकुलांचे बांधकाम केले आहे. येथे तृतीपंथीयांना सामावून घेण्याचा विचार आहे.
नासुप्रने तृतीपंथीयासाठी घरकुल योजनेची जाहिरात देऊन अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ३५० ते ४०० तृतीपंथीयांनी घरकुलासाठी अर्ज केले आहेत. घरकुल वाटपासंदर्भात बुधवारी नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी आपल्या कक्षात बैठक घेऊन तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. बैठकीत मनोजकुमार सूर्यवंशी, कार्यकारी महाव्यवस्थापक निशिकांत सुके, कार्यकारी अभियंता संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी लीना सोनवणे, किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे राणी ढवळे, डॉ. जानबा मस्के, निकुंज जोशी, सारथी ट्रस्टचे सीईओ आनंद चांदराणी, आंचल शर्मा, समाजकल्याण विभाग व नासुप्रचे अधिकारी उपस्थित होते.
समाजकल्याण विभागाकडूनही अनुदान
दुर्बल घटकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ देण्यासोबतच समाज कल्याण विभागाकडून तृतीपंथीयांना अनुदान मिळावे. यासाठी समाजकल्याण विभागाचे सचिवांकडे पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच शासनाकडूनही अनुदान प्राप्त करून सवलतीच्या दरात घरकुल उपलब्ध करण्याचा नासुप्रचा प्रयत्न आहे.