नागपूरमध्ये ‘फार्मा हब’ होण्याची क्षमता

By admin | Published: January 10, 2016 03:32 AM2016-01-10T03:32:39+5:302016-01-10T03:32:39+5:30

‘फार्मा’कडे आजच्या घडीला देशातील सर्वात यशस्वी उद्योग म्हणून पाहण्यात येत आहे. नागपूरचे भौगोलिक स्थान ...

The ability to become a pharma hub in Nagpur | नागपूरमध्ये ‘फार्मा हब’ होण्याची क्षमता

नागपूरमध्ये ‘फार्मा हब’ होण्याची क्षमता

Next

हंसराज अहिर : औषधविज्ञानशास्त्र विभागाच्या माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्याचे उद्घाटन
नागपूर : ‘फार्मा’कडे आजच्या घडीला देशातील सर्वात यशस्वी उद्योग म्हणून पाहण्यात येत आहे. नागपूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्रात विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि शहरात ‘फार्मा हब’ होण्याची जबरदस्त क्षमता असल्याचे मत केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधविज्ञानशास्त्र विभागातर्फे आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्याचे शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
नागपूर विद्यापीठाच्या महात्मा फुले शैक्षणिक परिसरातील विभागाच्या परिसरात आयोजित या महामेळाव्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी कऱ्हाड येथील कृष्णा आयुर्विज्ञान संस्थेचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम, ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.डी.के.अग्रवाल, विभागप्रमुख डॉ.नरेश गायकवाड, आयोजन समितीचे समन्वयक लवलिन खुराणा हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपुरात ‘नायपर’ या संस्थेला मंजुरी मिळाली आहे. या संस्थेसोबतच अनेक औषध कंपन्यांची नागपूरकडे नजर गेली आहे. येथे ‘फार्मा पार्क’, वैद्यकीय उपकरणे, ‘फार्मा क्लस्टर’ व संशोधन केंद्र उभे राहिले पाहिजे. यासाठी खासगी क्षेत्राकडूनदेखील पुढाकार अपेक्षित आहे. केंद्र शासनाकडून तर पूर्ण सहकार्य करण्यात येईलच, असे आश्वासन अहिर यांनी दिले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आपल्या वक्तृत्वाने उपस्थितांना प्रभावित केले. महाविद्यालयीन जीवनापासूनच संशोधनावर जास्तीत जास्त भर असला पाहिजे. ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.
डॉ.गायकवाड यांनी या परिषदेच्या आयोजनामागील प्रास्ताविक मांडले व माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ तसेच नागपूरच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन केले. देशविदेशात स्थायिक झालेले विभागातील माजी विद्यार्थी या महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी प्राध्यापकांचा सत्कारदेखील करण्यात आला. (प्रतिनिधी)

‘लॉजिस्टिक’मधून विकासाचा मार्ग : गडकरी
औषध कंपन्यांना नागपूरमध्ये येण्यात रस आहे, त्यांना विविध करांमध्ये सूट हवी आहे. परंतु या कंपन्यांना अशी सूट देण्याची आवश्यकता नाही. उलट या कंपन्यांनी नागपूरमध्ये उपलब्ध ‘लॉजिस्टिक’चा योग्य उपयोग केला तर त्यांचा फायदा होईल. या क्षेत्रातील काही कंपन्या एकत्र येऊन नागपूरात वैद्यकीय उपकरणे तयार करण्याचे ‘हब’ निर्माण करण्याचा आराखडा तयार करत आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. देशातील निर्यातीमध्ये औषधांचा फार मोठा वाटा आहे. पुढील काळात औषध उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. उद्योगाचा विचार करता नागपूर सर्व दिशांनी सोयीचे आहे, असेदेखील ते म्हणाले.

Web Title: The ability to become a pharma hub in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.