दुर्धर आजार अन् उंचीवर मात करून नागपूरच्या अबोलीचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 03:33 PM2018-06-09T15:33:03+5:302018-06-09T15:33:16+5:30
जन्मापासून किडनीचा आजार. उंची फक्त अडीच फूट. मागील वर्षी प्रकृती गंभीर झाली होती. परंतु अशा कठीण परिस्थितीतही धंतोलीच्या टिळक विद्यालयातील विद्यार्थिनी अबोली जरीत हिने ६५ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जन्मापासून किडनीचा आजार. उंची फक्त अडीच फूट. मागील वर्षी प्रकृती गंभीर झाली होती. परंतु अशा कठीण परिस्थितीतही धंतोलीच्या टिळक विद्यालयातील विद्यार्थिनी अबोली जरीत हिने ६५ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.
अबोलीला जन्मापासून किडनीचा आजार आहे. तिची एक किडनी निकामी झाल्यामुळे तिची उंचीही अडीच फुटापेक्षा जास्त वाढली नाही. अबोली नववीपर्यंत चालू शकत होती. परंतु ती दहावीला गेली आणि तिचा आजार वाढल्यामुळे तिचे दोन्ही पाय निकामी झाले. याच काळात तिची प्रकृतीही गंभीर झाली होती. त्यातून सावरत तिने जिद्दीने कुठलीही ट्युशन न लावता घरीच अभ्यास केला. परीक्षा देण्यासाठी तिने तनुश्री टेकम आणि उज्ज्वल दिवटे यांचे लेखनिक म्हणून सहकार्य घेतले. तिला शाळेतील शिक्षिका रोहिणी अगस्ती यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व परिस्थिती विपरीत असतानाही अबोलीने बिकट परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळविले आहेत. तिने मिळविलेल्या यशामुळे तिच्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे मत शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केले.