२४ तासांत ६० टक्के नफा, नंतर व्यापाऱ्याची २८.९४ लाखांनी फसवणूक
By योगेश पांडे | Published: March 26, 2024 05:36 PM2024-03-26T17:36:10+5:302024-03-26T17:37:27+5:30
२४ तासात ६० टक्के नफा देत सायबर गुन्हेगारांनी एका व्यापाऱ्याची तब्बल २८.९४ लाखांनी फसवणूक केली.
योगेश पांडे, नागपूर : सुरुवातीला २४ तासात ६० टक्के नफा देत सायबर गुन्हेगारांनी एका व्यापाऱ्याची तब्बल २८.९४ लाखांनी फसवणूक केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
हरमिंदर जागीरसिंग चानी (५४, हिवरीनगर) हे फर्निचर दुकानमालक आहे. त्यांना १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या टेलिग्राम खात्यावर एक लिंक आली. त्यावर क्लिक केले असता ते मॅरिएट हॉटेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (टीआरएफ) या ग्रुपमध्ये जोडल्या गेले. त्या ग्रुपमध्ये १३ सदस्य होते. समोरील व्यक्तीने गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल असे आमिष दाखविले. १७ ऑगस्ट रोजी चानी यांनी १० हजार रुपये गुंतविले. त्यांना २४ तासांतच ६ हजारांचा नफा मिळाला. त्यामुळे त्यांचा विश्वास वाढला. त्यांनी त्यानंतर २४ मार्चपर्यंत वेळोवेळी एकूण २८.९४ लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यात वळते केले.
मात्र, आरोपींनी कुठलाही नफा दिला नाही व मुद्दलही परत केली नाही. प्रत्येक वेळी ते वेगवेगळी कारणे द्यायचे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चानी यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.