दरवर्षी एक लाखामागे ८५ कॅन्सरचे रुग्ण
By admin | Published: June 16, 2017 02:12 AM2017-06-16T02:12:57+5:302017-06-16T02:12:57+5:30
नागपुरात एक लाख लोकसंख्येच्या मागे दरवर्षी ८५ नव्या कॅन्सर रुग्णांची भर पडत आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक : ‘हेड अॅण्ड नेक’चे सर्वाधिक रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात एक लाख लोकसंख्येच्या मागे दरवर्षी ८५ नव्या कॅन्सर रुग्णांची भर पडत आहे. तर भारतातील मिझोराम येथे हेच प्रमाण २०४ आहे. इतर देशांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सर्वाधिक आहे, अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज चौधरी यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी हॉस्पिटलचे संयुक्त संचालक डॉ. बी. के. शर्मा, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, हॉस्पिटलचे सहायक संचालक डॉ. सत्यशिल सप्रे, डॉ. करतार सिंग, डॉ. महेश क्रिपलानी आदी उपस्थित होते.
मुखकर्करोगाचे १५.७ टक्के रुग्ण
डॉ. चौधरी म्हणाले, नागपुरात एक लाख लोकसंख्येमध्ये १५.७ टक्के मुखकर्करोगाचे पुरुष रुग्ण आढळून येतात, तर जीभेच्या कर्करोगाचे ८ टक्के रुग्ण आढळतात. महिलांमध्ये मुखकर्करोगाची टक्केवारी ५.१ आहे. परंतु गर्भाशायाच्या कर्करोगाचे प्रमाण १३.५ टक्के आहे तर अंडाशय कर्करोगाचे प्रमाण ६.३ टक्के आहे.
रविवारी ‘हेड अॅण्ड नेक
कॅन्सर रिसेन्ट अपडेट्स’
राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल’ येथे ‘हेड अॅण्ड नेक कॅन्सर रिसेन्ट अपडेट्स’वर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात कॅन्सरवरील शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, मेडिकल आॅन्कोलॉजी आणि इम्युनोथेरपी यांच्यासह वेदना प्रबंधन, पॅलिलेशन या विषयावर भारतातील ज्येष्ठ कॅन्सर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. सोबतच वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञांसाठी ‘अॅडव्हान्स रेडिओथेरपी टेक्निक्स इन हेड अॅण्ड नेक कॅन्सर’वर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. चौधरी यांनी दिली.
५० टक्के कॅन्सरला तंबाखू कारणीभूत
५० टक्के कॅन्सरला तंबाखू हे कारणीभूत ठरते. नागपुरात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत नव्याने आढळून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ४९.४ टक्के पुरुष रुग्ण हे तंबाखूशी संबंधित कॅन्सरचे आहेत तर यात महिलांची टक्केवारी १८.२ टक्के आहे. विशेष म्हणजे मेघालयमध्ये तंबाखूशी संबंधित कॅन्सरच्या पुरुष रुग्णांची संख्या ६९.५ टक्के आहे तर महिलांची संख्या ४५ टक्के आहे.
कॅन्सर हॉस्पिटलची धक्कादायक आकडेवारी
राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये २०१२ व २०१३ या दोन वर्षांत २५२१ पुरुष तर २५३५ कॅन्सर रुग्णांनी उपचार घेतला. यातील तंबाखूमुळे झालेल्या कर्करोगाची टक्केवारी धक्कादायक आहे. तंबाखूमुळे तब्बल ६० टक्के पुरुष तर २२.६ टक्के महिलांना कॅन्सर झाल्याची नोंद आहे. यात पुरुषांमध्ये मुख कर्करोगाचे प्रमाण २०.९ टक्के, जीभेच्या कर्करोगाचे प्रमाण ९.६ टक्के तर ओठाच्या कर्करोगाचे प्रमाण ०.९ टक्के असे एकूण ३१.४ टक्के आहे. तर महिलांमध्ये मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण ८.१ टक्के, जीभेचा कर्करोगाचे प्रमाण ३.४ टक्के तर ओठाच्या कर्करोगाचे प्रमाण ०.३ टक्के आहे, असे एकूण ११.८ टक्के आहे.