थकीत बोनस देण्याबाबत व रब्बी धान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:17+5:302021-06-03T04:07:17+5:30
नागपूर : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना थकीत असलेला बोनस देणे, धानाची उचल करणे आणि रब्बी धान खरेदीसाठी काढलेले ...
नागपूर : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना थकीत असलेला बोनस देणे, धानाची उचल करणे आणि रब्बी धान खरेदीसाठी काढलेले अन्यायकारक परिपत्रक त्वरित रद्द करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन आ. डॉ. परिणय फुके यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ यांना दिले. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास आपण शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्यासही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा फुके यांनी दिला.
मागील सहा महिन्यांपासून खरीप हंगामातील धानाची उचल मिलर्सनी न केल्यामुळे गोडावूनमध्ये धान पडून आहे. अजूनही शेतकऱ्यांना खरीप हंगामातील धानाचे बोनस मिळालेले नाही. अशातच रब्बी हंगामातील धानाचे पीक घेण्याची वेळ आली असताना, शासनाने १९ मे रोजी एक तुघलकी परिपत्रक काढून, ३१ मेपर्यंत नोंद केलेल्या शेतकऱ्यांचे धान घेणे बंधनकारक नसल्याचे नमूद केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली व्यथा आ. फुके यांच्याकडे मांडली. शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी, थकीत बोनस व रब्बी हंगामातील धान उचल करण्याकरिता १९ मेचे परिपत्रक त्वरित रद्द करावे, अशी मागणी आ. फुके यांनी ना. छगन भुजबळ यांच्याकडे केली.
ना. छगन भुजबळ यांनी लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तात्काळ धानाची खरेदी, थकीत बोनस व रब्बी हंगामातील धान उचल करण्याकरिता काढण्यात आलेले परिपत्रक रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. (वा.प्र.)