स्वत:च्या विधी महाविद्यालयाबद्दल न्या. बोबडे यांना प्रचंड आत्मीयता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 09:12 PM2019-11-16T21:12:29+5:302019-11-16T21:15:32+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून १९७८ साली वकिलीची पदवी घेऊन बाहेर पडलेला एक विद्यार्थी एक दिवस देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर जाऊन विराजमान होईल, अशी कल्पनाही त्यावेळी कुणी केली नसेल. मात्र न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या रूपाने हा सर्वोच्च सन्मान या महाविद्यालयाला मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून १९७८ साली वकिलीची पदवी घेऊन बाहेर पडलेला एक विद्यार्थी एक दिवस देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर जाऊन विराजमान होईल, अशी कल्पनाही त्यावेळी कुणी केली नसेल. मात्र न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या रूपाने हा सर्वोच्च सन्मान या महाविद्यालयाला मिळाला. याचा सार्थ अभिमान महाविद्यालयातील प्रत्येक चेहऱ्यावर झळकतो. विधी महाविद्यालयाला जसा या विद्यार्थ्याचा अभिमान आहे तेवढीच आत्मीयता या विद्यार्थ्यालाही त्याच्या महाविद्यालयाबद्दल आहे. म्हणूनच न्या. बोबडे यांनी या महाविद्यालयाशी संवाद कायम ठेवला. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल यासाठी अगदी हायकोर्टाचे न्यायाधीश ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती होईपर्यंत कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी आवर्जून हजेरी लावली.
विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार यांनी कॉलेजच्या कार्यक्रमात येणाऱ्या या ‘आपल्या’ पाहुण्याच्या आठवणी सांगितल्या. नागपूर हायकोर्टाचे न्यायमूर्ती असताना २००४ ते २०११ पर्यंत विविध कार्यक्रमात ते उपस्थित झाले. जस्टा काजा महोत्सवातील प्रमुख पाहुणे म्हणून किंवा मुट कोर्ट स्पर्धेत न्यायाधीश म्हणून दिलेली भूमिका त्यांनी पार पाडली. पुढे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्यानंतर २०१६ च्या १४ व्या जस्टा काजा महोत्सवातही ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वाय.के. सबरवाल हे सुद्धा उपस्थित होते. न्या. बोबडे विद्यार्थी म्हणून येथे असताना अनेक गोष्टी जुन्या परिचितांकडून ऐकल्या होत्या. आजोबा व वडील वकील असल्याने कुटुंबातून मिळालेला न्यायसेवेचा वारसा त्यांच्यात होता. त्यांच्यातील कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे त्याला अधिकच झळाळी होती. ते बुद्धिमान होते तसेच कॉलेजच्या प्रत्येक उपक्रमात सक्रियपणे सहभागी असण्याचे व तरीही सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहण्याचे अनेक किस्से आम्ही ऐकत होतो. कार्यक्रमादरम्यान त्यांच्याशी संवाद आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामधून त्यांच्यातील व्यक्तित्त्वाचे दर्शन झाले.
न्या. शरद बोबडे यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय शालिन आहे आणि म्हणूनच प्रत्येकाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ पडत होती. विद्यार्थी त्यांच्याशी बोलण्यासाठी, हस्तांदोलनासाठी पुढे येत होते. तेही हसतमुखाने हा आदर स्वीकारत होते. यावेळी बोलताना ते विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थीदशेतील अनुभव सांगत. वकिलीच्या पेशात यशस्वी होण्यासाठी शिस्तीचा मार्ग त्यांनी सांगितला. या क्षेत्रातील आव्हाने आणि त्याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यांच्या या शालिन व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आजही विद्यार्थ्यांवर आहे. मीही या कॉलेजचा विद्यार्थी होतो आणि आज प्राचार्य म्हणून सेवारत आहे. त्यामुळे या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी देशाचा सरन्यायाधीश होतो आहे हा आमच्यासाठी सर्वोच्च अभिमानाचा क्षण असल्याची भावना डॉ. कोमावार यांनी व्यक्त केली.