पांडव कॉलेजच्या वसतिगृहात २५ वर विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:44 PM2019-06-10T23:44:18+5:302019-06-10T23:46:47+5:30
उमरेड मार्गावरील बहादुरा हद्दीतील पांडव कॉलेजच्या वसतिगृहातून परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या २५ वर विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी रात्री समोर आली. यातील ११ विद्यार्थिनींवर मेडिकलमध्ये उपचार करून परत पाठविण्यात आले, तर १४ विद्यार्थिनींना वॉर्ड क्रमांक ४९ मध्ये दाखल करून घेण्यात आले. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड मार्गावरील बहादुरा हद्दीतील पांडव कॉलेजच्या वसतिगृहातून परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या २५ वर विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी रात्री समोर आली. यातील ११ विद्यार्थिनींवर मेडिकलमध्ये उपचार करून परत पाठविण्यात आले, तर १४ विद्यार्थिनींना वॉर्ड क्रमांक ४९ मध्ये दाखल करून घेण्यात आले. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ‘स्कील इंडिया’कार्यक्रमांतर्गत उमरेड मार्गावरील बहादुरा हद्दीतील पांडव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तीन महिन्यांचे ‘नर्सिंग’चे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील विद्यार्थिनी पांडव कॉलेजच्या वसतिगृहात निवासी राहून हे प्रशिक्षण घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, या वसतिगृहात ३०० च्यावर विद्यार्थिनी आहेत. रविवार ९ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास काही विद्यार्थिनींनी जेवण केले. जेवण केल्यानंतर थोड्या वेळाने ५० च्यावर विद्यार्थिनींना उलटी, मळमळ व चक्कर येणे सुरू झाले. विद्यार्थिनींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, सायंकाळपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. काही विद्यार्थिनींना खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले, तर साधारण २५ वर विद्यार्थिनींना एका वसतिगृहाच्या महिला कर्मचारीने रात्री १० वाजताच्या सुमारास मेडिकल रुग्णालयात आणले. मेडिसीन अपघात विभागात तातडीने उपचाराला सुरुवात झाली. २५ पैकी नऊ ते दहा विद्यार्थिनींना प्राथमिक उपचारानंतर त्याचवेळी सुटी देण्यात आली, तर १४ विद्यार्थिनींची प्रकृती बघता त्यांना डॉ. दीप्ती चांद यांच्या नियंत्रणाखाली वॉर्ड ४९ मध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.
प्रकृती धोक्याबाहेर
मेडिकलचे उपअधीक्षक डॉ. गिरीश भुयार यांनी सांगितले, अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयित १४ विद्यार्थिनींची प्रकृती उपचारानंतर धोक्याबाहेर आहे. मंगळवार किंवा बुधवारी त्यांना सुटी देण्यात येईल.