६३ हजारावर ग्राहकांचे एप्रिलपासून वीजबिल थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:49 AM2019-03-14T00:49:02+5:302019-03-14T00:49:47+5:30
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल ६३ हजार ६९८ ग्राहकांनी एप्रिल २०१८ पासून कधीही वीजबिलाचा भरणा केलेला नाही, त्यांच्याकडील थकबाकीची ही रक्कम ५१ कोटी ९१ लाख ३० हजार ६२३ रुपये असून या ग्राहकांविरोधात महावितरणतर्फे मोहीम राबवण्यात येणार असून कठोर कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या नागपुर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल ६३ हजार ६९८ ग्राहकांनी एप्रिल २०१८ पासून कधीही वीजबिलाचा भरणा केलेला नाही, त्यांच्याकडील थकबाकीची ही रक्कम ५१ कोटी ९१ लाख ३० हजार ६२३ रुपये असून या ग्राहकांविरोधात महावितरणतर्फे मोहीम राबवण्यात येणार असून कठोर कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या नागपुर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल दिले आहेत.
वीज बिलांची थकबाकी असणाऱ्यांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई महावितरणकडून सातत्याने करण्यात येते मात्र सध्या आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्याने आणि अनेक महिने वीज बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या वाढल्याने महावितरणकडून वसुलीचा धडाका सुरू करण्यात आला आहे. वीज ग्राहकांकडे महावितरणच्या मासिक बिलाचा एक रुपयाही थकीत राहणार नाही, या ध्येयाने या मोहिमेमध्ये सर्वच अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. थकबाकीचा भरणा न झाल्यास कोणत्याही स्थितीत थकबाकीदाराचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार वीज बिलाची वसुली आणि थकबाकीदारांविरुद्धच्या कारवाईला वेग आला आहे.
एप्रिल २०१८ पासून वीजबिलांचा भरणा न केलेल्या ६३ हजार ६९८ ग्राहकांपैकी ५८ हजार ८२७ ग्राहकांकडे एक हजारापेक्षा अधिक रकमेची थकबाकी असून त्यांच्याकडील थकबाकीचा एकूण आकडा हा तब्बल ५१ कोटी ६३ लाख २४ हजार १०९ रुपयांचा आहे. थकबाकीदारांची ही यादी सर्व संबंधितांकडे देण्यात आली असून येत्या ३१ मार्चपर्यंत यापैकी अधिकाधिक रकमेची वसुली करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व क्षेत्रीय अभियंत्यांना देण्यात आले आहेत. यात अकोला जिल्ह्यातील ९ हजार ८७८ ग्राहकांनी, बुलडाणा जिल्ह्यातील १८ हजार २८१ ग्राहकांनी, वाशिम जिल्ह्यातील १५ हजार १७३ ग्राहकांनी, अमरावती जिल्ह्यातील ७ हजार ७६४ ग्राहकांनी तर यवतमाळ जिल्ह्यातील ८ हजार ५७८ ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून एकदाही वीजबिलांचा भरणा केलेला नाही, म्हणजेच संपुर्ण विदर्भातील एकूण ६३ हजार ६९८ ग्राहकांपैकी पश्चिम विदर्भातील एकूण ५९ हजार ६७४ ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून एकदाही वीजबिलांच भरणा केलेला नाही, त्यांचाकडील फेब्रुवारी २०१९ पर्यंतच्या थकबाकीची रक्कम ४६ कोटी ६२ लाख ९२ हजार ८३४ रुपये आहे.
तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ३३९, गडचिरोली जिल्ह्यातील १०२७, भंडारा जिल्ह्यातील १२४, गोंदिया जिल्ह्यातील २२४, नागपूर जिल्ह्यातील १९७५ तर वर्धा जिल्ह्यातील ३३५ ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून एकदाही वीजबिलांचा भरणा केलेला नाही. पूर्र्व विदर्भातील एकून ४०२४ ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून एकदाही वीजबिला भरणा केलेला नसून त्यांचेकडील आजपर्यंतच्या थकबाकीची रक्कम ५ कोटी २८ लाख ३७ हजार ७८९ एवढी आहे.