फरार बिल्डर पितापुत्र मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 04:11 PM2018-05-14T16:11:33+5:302018-05-14T16:11:53+5:30
सात जणांच्या मृत्यूला जबाबदार असल्याच्या आरोपावरून जबलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर फरार झालेले बिल्डर पितापुत्र नागपुरातील एका हॉटेलमध्ये दडून बसले होते. त्यांच्या दारुड्या वाहनचालकामुळे शनिवारी मध्यरात्री त्यांचा छडा लागला. महेश खेमतानी आणि आशिष खेमतानी अशी या दोघांची नावे आहेत. लकडगंज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मध्य प्रदेश पोलिसांच्या हवाली केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सात जणांच्या मृत्यूला जबाबदार असल्याच्या आरोपावरून जबलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर फरार झालेले बिल्डर पितापुत्र नागपुरातील एका हॉटेलमध्ये दडून बसले होते. त्यांच्या दारुड्या वाहनचालकामुळे शनिवारी मध्यरात्री त्यांचा छडा लागला. महेश खेमतानी आणि आशिष खेमतानी अशी या दोघांची नावे आहेत. लकडगंज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मध्य प्रदेश पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, खेमतानी पितापुत्र जबलपूरमधील मोठे बिल्डर आहे. त्यानी काही दिवसांपूर्वी बांधलेली १० माळ्याची इमारत निकृष्ट बांधकामामुळे जमीनदोस्त झाली. इमारतीच्या मलब्यात दबून सात जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जबलपूर पोलिसांनी महेश खेमतानी आणि त्याचा मुलगा आशिष या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हापासून ते जबलपुरातून फरार झाले. ते नागपुरात येऊन सोमलवाड्यातील एका हॉटेलमध्ये दडून बसले होते. त्याची कुणाला कुणकुण नव्हती. त्यांच्या सेवेत त्यांचा कारचालक निर्मलसिंग मनजीतसिंग होता. दारूच्या नशेत टुन्न होऊन शनिवारी रात्री ११ च्या सुमारास निर्मलसिंग गंगाजमुना परिसरातून एसक्रॉस कारने (एमपी २०/ डब्ल्यूए १३४५) वेगाने जात होता. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला रोखले. त्याच्या तोंडून उग्र दर्प येत असल्याने पोलिसांनी त्याची ब्रेथअॅनालायझरने तपासणी केली. तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याने ही कार जबलपूरमधील फरार बिल्डर खेमतानीची असून, आपण त्या पितापुत्राच्या सेवेत असल्याचे सांगितले. फरार बिल्डर वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये दडून असल्याचीही माहिती त्याने दिली.
जबलपूर पोलीस नागपुरात
ही माहिती वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून लकडगंज पोलिसांना कळविली. त्यानुसार, लकडगंज पोलिसांचे पथक मध्यरात्री बिल्डर पितापुत्राला ताब्यात घेण्यासाठी हॉटेलकडे रवाना झाले. त्यांनी खेमतानीला ताब्यात घेतल्यानंतर जबलपूर पोलिसांना कळविले. जबलपूर पोलिसांचे पथक पहाटे नागपुरात पोहचले. त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले अन् जबलपूरकडे हे पथक रवाना झाले.