लाचेची रक्कम घेऊन पळालेला पोलीस बेपत्ताच

By admin | Published: February 19, 2017 02:28 AM2017-02-19T02:28:50+5:302017-02-19T02:28:50+5:30

एसीबीच्या सापळ्यात अडकल्याचे ध्यानात येताच लाचेची रक्कम घेऊन पसार झालेला हुडकेश्वर ठाण्यातील

The absconding police escaped with the bribe money | लाचेची रक्कम घेऊन पळालेला पोलीस बेपत्ताच

लाचेची रक्कम घेऊन पळालेला पोलीस बेपत्ताच

Next

अटकेतील आरोपींचा पीसीआर : एसीबीसोबत पोलिसांचीही शोधाशोध
नागपूर : एसीबीच्या सापळ्यात अडकल्याचे ध्यानात येताच लाचेची रक्कम घेऊन पसार झालेला हुडकेश्वर ठाण्यातील पोलीस हवालदार गुरुदेव संतोषराव कुंभलकर २४ तासांपेक्षा जास्त कालवधी होऊनही पोलिसांना सापडला नाही. दरम्यान, या प्रकरणात एसीबीने शुक्रवारी दुपारी जेरबंद केलेल्या नायक पोलीस शिपाई संजय मारोतराव बांगडकर (वय ४५) आणि पोलीस शिपाई शोएब हबीब शेख (वय ३२) या लाचखोरांना कोर्टात हजर करून त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळवली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय बांगडकर हा हुडकेश्वर ठाण्यातील डीबी (गुन्हे प्रकटीकरण) पथकात आहे. या पथकाने पकडलेल्या एका चोरट्याने आपण चोरीचे सोने पारडीतील सराफा व्यावसायिकाला विकल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. तेव्हापासून बांगडकरने सराफा व्यावसायिकाला चोरीचे सोने घेण्याच्या आरोपात अटक करण्याची भीती दाखवणे सुरू केले. कारवाई टाळायची असेल तर पाच हजारांची लाच द्यावी लागेल, असे बांगडकर म्हणाला. लाच मिळावी म्हणून त्याने सराफा व्यावसायिकाला त्रस्त केल्यामुळे सराफा व्यावसायिकाने ४ फेब्रुवारीला बांगडकर याने लाच मागितल्याची एसीबीकडे तक्रार नोंदवली. शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार, सराफा व्यावसायिकाने लाचेची रक्कम देण्यासाठी शुक्रवारी दुपारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात बांगडकरची भेट घेतली. मात्र, त्याने ही रक्कम पोलीस शिपाई शोएब हबीबकडे देण्यास सांगितले. शोएबने तिसऱ्या व्यक्तीकडे तर, तिसऱ्या व्यक्तीने कुंभलकरकडे रक्कम देण्याचा इशारा केला. कुंभलकरने रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने शोएब आणि बांगडकरच्या मुसक्या बांधल्या. ते पाहून लाचेची रक्कम स्वीकारणारा हवालदार कुंभलकर ठाण्यातून पळून गेला. एसीबीच्या पथकाने कुंभलकरच्या घरी आणि नातेवाईकांकडे शोधाशोध चालवली आहे.
मात्र, २४ तासांपेक्षा जास्त अवधी होऊनही तो सापडला नाही. दरम्यान, एसीबीने अटक केलेल्या बांगडकर आणि शोएबला शनिवारी दुपारी कोर्टात हजर करून त्याचा २ दिवसांची कोठडी मिळवली. फरार कुंभलकरचा एसीबीचे पथक तसेच पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The absconding police escaped with the bribe money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.