नागपुरात वैवाहिक सुखापासून वंचित युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:29 AM2018-11-28T01:29:24+5:302018-11-28T01:30:56+5:30
वैवाहिक सुखापासून वंचित असलेल्या युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतनामीनगरात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैवाहिक सुखापासून वंचित असलेल्या युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतनामीनगरात घडली. मृत ३८ वर्षीय गौरीशंकर सहगल आहे. सहगल गारमेंटच्या दुकानात काम करीत होता. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा व मुलगी होती. घरगुती कलहामुळे पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली होती. ती मुलगा व मुलीला घेऊन पंजाबला गेली होती. त्यामुळे गौरीशंकर एकटा राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते.
सूत्रांच्या मते, गौरीशंकरने ४ सप्टेंबरला सारिका नावाच्या युवतीशी लग्न केले होते. सारिकासुद्धा त्याच्यासोबत राहू शकली नाही. सारिकाला तिच्या पहिल्या नवऱ्यासोबत बोलताना बघून तो व्यथित झाला होता. किमान एक महिना सारिका गौरीशंकरसोबत राहिली. त्यानंतर तिचे कुटुंबीय तिला घरी घेऊन गेले होते. त्यानंतर गौरीशंकर आई मंजूसोबत राहत होता. सोमवारी दुपारी मंजू रुग्णालयात गेली असता, त्याने फाशी घेतली. आई ३.१५ वाजता घरी आल्यानंतर गौरीशंकर फाशीवर लटकलेल्या अवस्थेत आढळला.
घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसाचे एएसआय राजकुमार उपाध्याय घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी त्याच्या रुममधून सुसाईड नोट मिळविली. त्यात त्याने सारिका सोडून गेल्यामुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. त्याने आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार ठरविले नाही.