कोट्यवधीच्या संपत्तीधारकास रस्त्यावर आणणारा कुख्यात आबू फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:12 AM2021-08-29T04:12:10+5:302021-08-29T04:12:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - त्याच्याकडे सुमारे एक ते दीड कोटीची मालमत्ता होती. १२ वर्षांपूर्वी कुख्यात गुंड आबू खान ...

Abu Farar, the infamous man who brought billions of rupees to the streets | कोट्यवधीच्या संपत्तीधारकास रस्त्यावर आणणारा कुख्यात आबू फरार

कोट्यवधीच्या संपत्तीधारकास रस्त्यावर आणणारा कुख्यात आबू फरार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - त्याच्याकडे सुमारे एक ते दीड कोटीची मालमत्ता होती. १२ वर्षांपूर्वी कुख्यात गुंड आबू खान आणि त्याच्या गुंडांनी धाकदपट करून त्याची मालमत्ता जबरदस्तीने आपल्या नावे लिहून घेतली. त्यामुळे तो आता चक्क फूटपाथवर दिवस काढतो. हिम्मत करून त्याने आपली व्यथा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितली अन् त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार फिरोज ऊर्फ आबू खानविरुद्ध २४ तासांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. त्यामुळे आबू आता साथीदारांसह फरार झाला आहे.

मध्यभारतातील सर्वात मोठा ड्रग माफिया म्हणून आबू खान कुख्यात आहे. गेल्या २५ वर्षांपासून तो आणि त्याच्या टोळीतील गुंड अंमली पदार्थांची विक्री करण्यासोबतच जमीन बळकावणे, खंडणी वसुली करणे आदी गुन्ह्यातही सहभागी आहेत. २००९ मध्ये आबूने ताजबागमध्ये राहणाऱ्या फिरदोस ऊर्फ राणू खान याचे सुमारे ४५०० चाैरस फुटाचे तीन भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे ताब्यात घेतले. फिरदोसच्या आईच्या निधनानंतर त्याचे राहते घर उद्ध्वस्त करून आबू आणि त्याच्या साथीदारांनी त्याला भूखंडाची किंमत न देता तेथून हुसकावून लावले. पैशाची मागणी केली असता आबू आणि त्याचे साथीदार फिरदोसला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी द्यायचे. त्यामुळे एवढ्या मोठ्या जागेचा मालक असलेला फिरदोस अक्षरश: फूटपाथवर राहू लागला. त्याची ही व्यथा सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे गेली. त्यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना ‘आबूचा बंदोबस्त’ करण्यास सांगितले. त्यानुसार, फिरदोस याची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी शुक्रवारी भूखंड बळकावणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी आरोपावरून कुख्यात आबू आणि त्याच्या भावांसह ११ जणांविरुद्ध सक्करदऱ्यात गुन्हा दाखल केला.

----

((१))

रेस्टॉरंट मालकाने जीव सोडला

२००० मध्ये ताजबागमधील एका रेस्टॉरंट चालकावर खंडणीसाठी दबाव आणून आबू आणि साथीदारांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. त्यानंतर खंडणीसाठी त्याने त्रास देणे सुरू केले. त्याच्या दडपणात येऊन रेस्टॉरंटचे मालक आजारी पडले अन् त्यांचा जीव गेला. आता त्यांच्या मुलाने ते रेस्टॉरंट सुरू केल्यानंतर खंडणीसाठी त्यांनाही त्रास देणे सुरू झाले. त्यामुळे शफिक खान अजिज खान यांनी तक्रार दिली. त्यावरून शनिवारी सक्करदऱ्यात आबू आणि साथीदारांविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल केला.

----

((२))

ताजबागमधील अनेक व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली

कुख्यात आबू आणि त्याच्या टोळीतील गुंड गेल्या अनेक वर्षांपासून ताजबाग परिसरातील दुकानदारांकडून खंडणी वसुली करतात. खंडणी दिली नाही तर ते त्यांना धमक्या देतात. मारहाण करून अपमानीत करतात. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्याकडे आता अशा अनेक तक्रारी आल्याने आबू गँगचे नव्याने कंबरडे मोडण्याची तयारी पोलिसांनी चालविली आहे. या पार्श्वभूमीवर, आबूच्या घराची शनिवारी रात्री झडती घेण्यात आली; मात्र तो फरार झाल्यामुळे त्याचा आता इकडे तिकडे शोध घेतला जात आहे.

----

((३))

जामिनावर येताच आबू टोळी सक्रिय

कुख्यात आबू आणि त्याच्या टोळीचे अंमली पदार्थाचे साम्राज्य गुन्हे शाखा पोलिसांनी उद्ध्वस्त केले. तब्बल दीड वर्ष आबू कारागृहात बंदिस्त होता. त्यामुळे त्याने कारागृहात आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. नंतर त्याला जामीन मिळाला आणि बाहेर येताच आबू तसेच त्याची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दाखल झालेल्या गुन्ह्यांमधून उघड झाले आहे.

----

Web Title: Abu Farar, the infamous man who brought billions of rupees to the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.