लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 01:42 PM2022-06-25T13:42:52+5:302022-06-25T13:48:06+5:30
आरोपी कुख्यात चोर असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.
नागपूर : अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या कुख्यात चोरट्याला विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच पाच हजार रुपये दंड ठोठावला व दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे स्पष्ट केले. न्या. एस. आर. त्रिवेदी यांनी हा निर्णय दिला. ही घटना मानकापूर येथील आहे.
गुरुदयाल उर्फ राजू रामेश्वर खतरिया (३०) असे आरोपीचे नाव असून घटनेपूर्वी तो झिंगाबाई टाकळीतील गीतानगरात भाड्याने राहत होता. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १६ वर्षे वयाची होती. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात फसविले होते. दरम्यान, त्याने मुलीला पळवून नेण्याचा कट रचला. त्यानुसार, त्याने १२ एप्रिल २०२० रोजी मुलीला भेटण्यासाठी बोलावले. त्याच्या सांगण्यावरून मुलगी मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असल्याची माहिती देऊन दुपारी ४ च्या सुमारास घरून निघून गेली. त्यानंतर ती घरी परत आली नाही. आरोपीने तिला दुचाकीवर बसवून गोधणी परिसरातील झोपडीत नेले. तेथे त्याने मुलीवर वारंवार बलात्कार केला. काही दिवसांनी त्यांचा सुगावा लागला. पोलिसांनी आरोपीला अटक करून मुलीला घरी रवाना केले. आरोपी कुख्यात चोर असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सरकारने तपासले ९ साक्षीदार
न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. कल्पना पांडे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी आरोपीविरुद्ध ९ साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जबाब व वैद्यकीय पुराव्यांवरून आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला.