माहिती अधिकाराच्या दुरुपयोगावर चाप असायला हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 08:31 PM2022-09-24T20:31:46+5:302022-09-24T20:32:21+5:30
Nagpur News खंडणी उकळणे, ब्लॅकमेलिंग करणे असे प्रकार या अधिकाराच्या दुरुपयोगामुळे होत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारांवर चाप असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
नागपूर : आरटीआय अर्थात माहिती अधिकाराच्या कायद्यामुळे सर्वसामान्यांना अधिकार प्राप्त झाले. मात्र, याच कायद्याचा दुरुपयोग करणारेही अनेक आहेत. खंडणी उकळणे, ब्लॅकमेलिंग करणे असे प्रकार या अधिकाराच्या दुरुपयोगामुळे होत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारांवर चाप असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
शनिवारी विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे आणि ज्येष्ठ पत्रकार महेंद्र सुके यांना ‘अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार - २०२१’ने सन्मानित करण्यात आले. प्रेस क्लबच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विकास सिरपूरकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी, टिळक पत्रकार भवनचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव व्यासपीठावर उपस्थित होते.
गेल्या दोन-अडीच वर्षांत अनेक समित्यांचे गठन झालेले नाही. अनेक उपक्रमांचे निधी गोठविले गेले आहे. अनेक पुरस्कारांचे वितरणही झालेले नाही. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा रखडलेल्या या गोष्टी सुरू केल्या होत्या आणि आत पुन्हा आमचे सरकार आल्यावर नव्याने या सगळ्या गोष्टी सुरू करणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शुभदा फडणवीस यांनी केले, तर आभार जोसेफ राव यांनी मानले.
.............