‘रॉ’च्या लोगो आणि छायाचित्राचाही गैरवापर : सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:48 AM2019-06-14T00:48:04+5:302019-06-14T00:48:58+5:30
येथील एका महिलेसोबत लग्न करण्यासाठी स्वत:ला ‘रॉ’ एजंट असल्याचे सांगणारा ठगबाज इमरान खान नूर मोहम्मद खान (वय ३९, रा. रा. शिवाजीनगर गोवंडी मुंबई) याने संबंधित महिलेला रॉ चा लोगो आणि काही छायाचित्रेही पाठविली होती, असे तपासात उघड झाले आहे. परिणामी सुरक्षा यंत्रणांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. इमरानला गिट्टीखदान पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करून त्याची १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील एका महिलेसोबत लग्न करण्यासाठी स्वत:ला ‘रॉ’ एजंट असल्याचे सांगणारा ठगबाज इमरान खान नूर मोहम्मद खान (वय ३९, रा. रा. शिवाजीनगर गोवंडी मुंबई) याने संबंधित महिलेला रॉ चा लोगो आणि काही छायाचित्रेही पाठविली होती, असे तपासात उघड झाले आहे. परिणामी सुरक्षा यंत्रणांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. इमरानला गिट्टीखदान पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करून त्याची १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळवली.
इमरान हा मुंबई पोलिसांचा पंटर म्हणून काम करतो. त्यामुळे त्याला पोलीस आणि गुन्हेगारी जगताची माहिती आहे. दोन महिन्यापूर्वी त्याची गिट्टीखदानमधी्रल एका घटस्फोटित महिलेसोबत ओळख झाली. तिच्यासोबत लग्न करण्याची बतावणी करून इमरानने स्वत:ची ओळख ‘रॉ’ एजंट म्हणून दिली होती. महिलेविरुद्ध नोव्हेंबर २०१८ मध्ये अंबाझरी ठाण्यात एकप्रकरण दाखल झाले होते. तिने हे इमरानला सांगताच त्याने अंबाझरी ठाण्यातील अधिकाऱ्यासोबत संपर्क केल्याची थाप मारून महिलेला या प्रकरणातून सोडविण्याचीही बतावणी केली होती. त्यामुळे महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला होता. त्याचा गैरफायदा घेत आरोपी इमरानने तिच्याकडून वेगवेगळ्या नावाखाली रक्कम उकळणे सुरू केले. तिच्याकडून ३० हजार रुपये उकळणाºया इमरानकडून मोठमोठ्या थापा मारून रक्कम मागितली जात असल्यामुळे महिलेला संशय आला. तो नागपुरातच मुक्कामी असल्याने महिलेने त्याला काही प्रश्न विचारले त्यामुळे तो संतापला आणि दारूच्या नशेत त्याने गोंधळ घालणे सुरू केले. पोलिसांचे नाव काढताच आपले पोलीस काय बिघडवणार, अशी विचारणा करून स्वत:च गिट्टीखदान ठाण्यात पोहचला. एवढेच नव्हे तर स्वत:ला रॉ एजंट संबोधून त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला. त्यामुळे त्याची पोलखोल झाली. त्याला अटक केल्यानंतर प्राथमिक तपासात इमरानने रॉ चा लोगो आणि काही छायाचित्रेही महिलेकडे पाठविली होती, असे उघड झाले आहे. परिणामी सुरक्षा यंत्रणांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
संवेदनशील मुद्यांचीही तपासणी
इमरानने कधी पाकिस्तान तर कधी दुसऱ्या देशात असल्याची थाप मारून महिलेला बँक खात्यात रक्कम जमा करायला लावली. ते बँक खाते कुणाचे आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याचे पाकिस्तानसह अन्य देशात नातेवाईक आहेत. त्यांच्याशी याचे संवेदनशील मुद्यांच्या संबंधाने काही कनेक्शन आहे का, त्याचीही आता चौकशी केली जात आहे.