अभाविपकडून शिक्षणमंत्र्यांना घरचा अहेर; शासनाच्या धोरणांवर नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 09:02 PM2017-12-09T21:02:14+5:302017-12-09T21:02:51+5:30
शिक्षणक्षेत्रात अद्यापही ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षाच असून शिक्षणमंत्र्यांकडून वारंवार विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात येत आहेत, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शिक्षणक्षेत्रात अद्यापही ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षाच असून शिक्षणमंत्र्यांकडून वारंवार विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात येत आहेत, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणांबाबत ‘अभाविप’ने उघड नाराजी व्यक्त केली असून ११ डिसेंबर रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात संपूर्ण विदर्भात निदर्शने करण्यात येणार आहेत.
खुल्या विद्यार्थी संघ निवडणुका, सत्र प्रणाली, शिष्यवृत्ती, शैक्षणिक धोरणातील निवड प्रक्रिया इत्यादी बाबींमध्ये सरकार उदासीन आहे. यासंदर्भात वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून सरकारला कळविण्यात आले आहे. मात्र तरीदेखील सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. शिवाय नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी संघाच्या निवडणुका खुल्या पद्धतीने होतील, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र लोकशाही पद्धतीने निवडणुका न घेता ‘सिलेक्शन’ पद्धतीने निवडणुका घेण्याचा सरकारचा मानस आहे. याबाबतचे विधेयक सरकारने आणले आहे. याचा आम्ही निषेध करतो, असे विदर्भ प्रांतमंत्री विक्रमजीत कलाने यांनी सांगितले.
या आहेत मागण्या
विद्यार्थी संघ निवडणुका खुल्या पद्धतीने घेण्यात याव्या, सत्र प्रणाली बंद करण्यात यावी, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळावी, एक खिडकी शिष्यवृत्ती योजना सुरू व्हावी, या ‘अभाविप’च्या प्रमुख मागण्या आहेत.