नागपूर विद्यापीठात अभाविपचा गोंधळ : परिसरात तोडफोड, दोन सुरक्षारक्षक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 10:38 PM2019-02-08T22:38:45+5:302019-02-08T22:42:08+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ केला. सोबतच विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार, प्र-कुलगुरू कार्यालय प्रवेशद्वार व कुलसचिव कार्यालयात तोडफोड केली. कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ केला. सोबतच विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार, प्र-कुलगुरू कार्यालय प्रवेशद्वार व कुलसचिव कार्यालयात तोडफोड केली. कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले.
विद्यापीठाच्या बीकॉम अभ्यासक्रमाच्या पाचव्या व तिसऱ्या सत्राचे निकाल लागलेले नाहीत. सोबतच पहिल्या सत्राचे निकाल संकेतस्थळावर दाखविण्यात येत नाहीत. सोबतच बीकॉमच्या अभ्यासक्रमात परीक्षेच्या अगोदर बदल करण्यात आले आहेत. तसेच पूनर्मूल्यांकनाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मन:स्ताप होत असल्याचा आरोप करत ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात दुपारच्या वेळी धडक दिली. यावेळी सुरक्षेच्या कारणावरुन विद्यार्थ्यांना थांबविण्यात आले. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. काही कार्यकर्त्यांनी तोडफोड केली असल्याचा आरोप सुरक्षारक्षकांतर्फे करण्यात आला. बरेच विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी तर दीक्षांत सभागृहातच घोषणा दिल्या.
‘अभाविप’चा सुरक्षारक्षकांवरच आरोप
दुसरीकडे ‘अभाविप’चे महानगर मंत्री वैभव बावनकर यांनी सुरक्षारक्षकांवरच आरोप केले आहेत. शांततेने निवेदन द्यायला जात असताना सुरक्षारक्षकांनी कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर थांबविले. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत धक्काबुक्की करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान ‘अभाविप’च्या मागण्याचा सकारात्मक विचार करुन त्यांना मंजूर करण्याचे आश्वासन प्रभारी कुलसचिवांनी दिले असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. यावेळी विधीसभा सदस्य विष्णू चांगदे, वामन तुरके हेदेखील उपस्थित होते.
पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका
दरम्यान हा गोंधळ होत असताना विद्यापीठात पोलीस कर्मचारीदेखील उपस्थित होते. मात्र त्यांनी कुठलीही मध्यस्थी केली नाही. गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी कुलसचिव डॉ.निरज खटी यांनी सांगितले. मात्र पोलीस तक्रार करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही.