मोतीबाग रेल्वे वर्कशॉपमध्ये होणार एसी कोचची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:22 AM2019-02-08T00:22:51+5:302019-02-08T00:24:34+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत मोतीबाग वर्कशॉपमध्ये ब्रॉडगेज कोचची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. आता येथे एसी कोचच्या दुरुस्तीची सुविधा उपलब्ध झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून यामुळे मोतीबाग वर्कशॉपला नव संजीवनी प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत मोतीबाग वर्कशॉपमध्ये ब्रॉडगेज कोचची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. आता येथे एसी कोचच्या दुरुस्तीची सुविधा उपलब्ध झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून यामुळे मोतीबाग वर्कशॉपला नव संजीवनी प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा नागपूर विभागाचा माल वाहतुकीसाठी देशभरात नावलौकिक आहे. या विभागांतर्गत नॅरोगेज रेल्वेचे सर्वाधिक जाळे आहे. त्यामुळे मोतीबाग वर्कशॉपमध्ये नॅरोगेज रेल्वेच्या इंजिनसह कोचच्या दुरुस्तीची व्यवस्था करण्यात आली होती. कालांतराने देशभरातील नॅरोगेज मार्ग संपविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला. त्यानुसार ब्रॉडगेजचे जाळे नागपूरपर्यंत पोहोचले आणि नॅरोगेज मार्गाला ब्रॉडगेजमध्ये रुपांतरीत करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले. त्यानंतर नॅरोगेज रेल्वेगाड्या बंद होऊन कोच आणि इंजिनच्या दुरुस्तीचे काम कमी झाले. रेल्वे प्रशासनाने मोतीबाग वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांच्या हाताला काम देण्यासाठी येथे ब्रॉडगेज कोचच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू केले. आता झपाट्याने ब्रॉडगेजचे काम सुरू असल्यामुळे आगामी काळात येथे एसी कोचच्या दुरुस्तीची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मोतीबाग वर्कशॉपला नव संजीवनी मिळविण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.