कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी शैक्षणिक सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:18 AM2018-09-08T00:18:30+5:302018-09-08T00:19:28+5:30
विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शैक्षणिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव देणे आवश्यक आहे. तंत्रशिक्षण विभागात प्रात्यक्षिक ज्ञानातून कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विविध कंपन्यांशी करण्यात आलेले शैक्षणिक सामंजस्य करार (एमओयु) फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन नागपूर तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शैक्षणिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव देणे आवश्यक आहे. तंत्रशिक्षण विभागात प्रात्यक्षिक ज्ञानातून कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विविध कंपन्यांशी करण्यात आलेले शैक्षणिक सामंजस्य करार (एमओयु) फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन नागपूर तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी केले.
शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाने विदर्भातील २० विविध औद्योगिक संस्थाशी शैक्षणिक उपक्रमांचे सामंजस्य करार केले. एमओयु स्वाक्षरीच्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्हीएनआयटीचे विश्वस्त व्ही. आर. जामदार, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे आणि प्राचार्य डॉ. चंद्रशेखर थोरात आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, भारतातील अभियंता जगात सर्वोत्तम आहेत. अशा सामंजस्य करारांमुळे तंत्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना उद्योगसमूहाशी थेट संबंध साधता येतो. काळानुसार गुणवत्तेची संकल्पना बदलत आहे. अशा बदलत्या संकल्पनेची डोळसपणे दखल घेऊन शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाने स्वयंस्फूतीर्ने हे कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. त्यातून शैक्षणिक ज्ञानाला उद्योगसमूहातील प्रात्यक्षिक ज्ञानाची जोड मिळेल. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील. शैक्षणिक उपक्रमात उद्योगसमूहांच्या प्रकल्प भेटींचे अहवाल तयार करणे, तज्ज्ञांची व्याख्याने यातून विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाला उद्योगाभिमुखतेची जोड मिळेल. विद्यापीठ व तंत्रशिक्षण संस्था यांच्यात असे करार करण्याची गरज असून, समाजाला हवा असलेला उद्योगाभिमुख अभियंता अशा करारांमधूनच मिळेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
विश्वास जामदार म्हणाले, पुस्तकी ज्ञानाचे दिवस आता संपले असून, प्रात्यक्षिक अनुभव असलेल्या कुशल मनुष्यबळाला आज मागणी आहे. देशात खूप मोठ्या कंपन्या असून, अशा कंपन्यांना आयआयटीच्या माध्यमातून कुशल अभियंते मिळत आहे. मात्र सर्वजण आयआयटीमधून शिक्षण घेऊ शकत नाही. आपण काळानुसार आव्हान स्वीकारत आहोत. या करारातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जातील. उद्योगभिमुख नोकरी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. अतुल पांडे यांनी संस्थेच्या इतिहासात हा सुवर्णक्षण असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी विविध कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या करारासाठी समन्वयक डॉ. राजेश्वरी वानखेडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनिया राऊत यांनी केले. तर संचालन डॉ. रुपाली हिरुरकर यांनी केले. डॉ. राजेश्वरी वानखेडे यांनी आभार मानले.